मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) भाडेतत्त्वावरील नवीन १३१० खासगी बसगाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई आणि पुणे विभागासाठी ४५०, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक विभागासाठी ४३०, तर अमरावती व नागपूर विभागासाठी ४६० नवीन बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
यापूर्वी महामंडळाने सुमारे ३५० बस भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे भविष्यात साध्या बसची कमतरता भरून काढण्यासाठी भाडेतत्त्वावर आणखी काही बस घेण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचाराधीन होता. शिवनेरी आणि शिवशाही या आरामदायी बससाठी भाडेतत्त्वावरील बस घेण्याचा प्रयोग यापूर्वी एसटी महामंडाने केला आहे. अशाच पद्धतीने खासगी संस्थेचा चालक, डिझेल आणि बसची तांत्रिक देखभाल करणे या अटीवर पुढील सात वर्षांसाठी या बसगाड्या घेण्यात येणार असून संबंधित खासगी संस्थेला प्रति / किलोमीटरप्रमाणे एसटी महामंडळ भाडे अदा करणार आहे.
हेही वाचा – ‘मेट्रो १’च्या सेवा कालावधीत ७ आणि १७ सप्टेंबर रोजी वाढ
यापूर्वीच महामंडळ स्तरावर शासनाच्या निधीतून २२०० बसगाड्या घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यापैकी पहिल्या ३०० बस नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार सुमारे दोन हजार बस खरेदी करण्याचा नवा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास शासनाच्या निधीतून आणखी दोन हजार बस एसटी महामंडळ येत्या वर्षभरात घेणार आहे. त्यामुळे भविष्यात एसटीच्या ताफ्यात पाच हजार ३०० बसगाड्या दाखल होणार आहेत.