परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

एसटीचा पास काढण्यासाठी २६० रुपये नसल्याने लातूरच्या स्वाती पिटले या विद्याíथनीला आत्महत्या करावी लागल्याच्या दुर्दैवी घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत पास देण्याचा निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी जाहीर केला.
स्वाती पिटलेच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात संवेदनशीलता व्यक्त करतांना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत पास द्यावा अशी सूचना केली. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून त्यांनीही या योजनेस सहमती दर्शविल्याचे रावते यांनी सांगितले. एसटीचा पास काढण्यासाठी पसे नाहीत म्हणून एका विद्याíथनीला आत्महत्या करावी लागते ही बाब मोठी हृदयद्रावक आहे. एसटी ही सामाजिक भान जपणारी संस्था आहे. याआधीच एसटीने पासमध्ये सवलत दिली होती. मात्र आता सवलतीचाही दर गोरगरीब विद्यार्थ्यांना परवडत नाही हे लक्षात घेऊन उर्वरित शैक्षणिक सत्रामध्ये मराठवाडय़ातील इयत्ता ११वीपासून पुढे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत पास देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्याचा फायदा मराठवाडय़ातील ४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना होणार असून एसटी महामंडळावर ९ कोटी १८ लाखांचा बोजा पडणार आहे. हा भार राज्य सरकारने उचलावा तसेच राज्यभरात ही योजना लागू करण्याबाबत विचार करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही रावते म्हणाले.

स्वाती अभय योजना
स्वाती पिटलेला श्रद्धांजली म्हणून या योजनेला ‘स्वाती अभय योजना’ असे नाव देण्यात आले असून १ नोव्हेंबरपासून ही योजना सुरू होणार आहे. सध्या केवळ मराठवाडय़ापुरता हा निर्णय मर्यादित असला तरी राज्य सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचेही रावते यांनी सांगितले.