मुंबई : मुंबईमध्ये पुढील आठवडय़ात ‘जी २०’ची बैठक होत असून यात सहभागी होणारे १२० सदस्य महापालिका मुख्यालयाला भेट देणार आहेत. पाहुण्यांच्या चहापानासाठी महापालिकेने पंचतारांकित सोयी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सात-आठ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जी २०’ शिखर परिषदेची पुढील बैठक मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात मुंबईत होणार आहे. यादरम्यान आपत्कालीन जोखीम कमी करण्यासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञ समितीचे सदस्य २३ मे रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत पालिका मुख्यालयाला भेट देणार आहेत. महापालिकेची यंत्रणा सध्या स्वागताच्या तयारीत गुंतली आहे. चहापानाचा खर्च महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार असून त्याकरीता खास पंचतारांकित पदार्थ, सेवा देण्यात येणार आहेत.

‘जी २०’ परिषदेसाठी आधीच महापालिकेने रंगरंगोटी, रस्त्यांची सुधारणा, रोषणाई याकरीता कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. त्यात पाहुणचाराच्या खर्चाची भर पडणार आहे. जुन्या इमारतीमध्ये सदस्यांची सरबराई करण्यात येणार आहे. सदस्यांना चहापानासाठी खास पंचतारांकित हॉटेलांमधील खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. त्याकरीता उंची कपबशा व चमचे असे साहित्यही वापरण्यात येईल. या सगळय़ावर सात ते आठ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागवल्या आहेत. वडापाव, पाणीपुरीचाही बेत परदेशी पाहुण्यांना पंचतारांकित खाद्यपदार्थ, चहा-कॉफी, उंची बिस्किटे याबरोबरच कॉन्टीनेण्टल पद्धतीचे नाश्त्याचे पदार्थ देण्यात येणार आहेत. तसेच मुंबईची खास ओळख असलेले वडापाव आणि पाणीपुरीदेखील पाहुण्यांना चाखता येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G20 guests expenses burden on mumbai municipal corporation mumbai print news zws