मुंबई : तिला वाघ, सिंह आदी वन्य प्राण्यांची आवड होती. चित्रात ती विविध प्राणी बघत होती. त्यामुळे वडिलांनी तिला दिवाळीच्या सुट्टीत मुंबईमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) वाघ, सिंग दाखविण्यासाठी आणले. राष्ट्रीय उद्यानातील वन्य प्राणी पाहून ती आनंदी झाली. पण हा आनंद क्षणभंगूर ठरला. राष्ट्रीय उद्यान परिसरातच एका भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकीत तिचा मृत्यू झाला. नवी मुंबईमधील ऐरोली येथे वास्तव्यास असलेले सुजितकुमार यादव (३०) चालक म्हणून काम करतो. तो पत्नी राजकुमारी (३०) आणि दोन वर्षांची मुलगी मानसीसोबत राहतो.
मुंबई – राजकोटदरम्यान ट्रक चालवून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहन करतो. सुजितकुमारची मुलगी मानसीला वन्य प्राणी पाहण्याची इच्छा होती. आई – वडील तिला चित्रात, मोबाइलमध्ये वाघ, सिंग आदी विविध प्राणी दाखवत होते. दिवाळीनिमित्त बुधवारी सुजितकुमारचा आते भाऊ शिवम (१७) घरी आला होता. त्यामुळे मुलीला वन्य प्राणी दाखवावे असा विचार सुजितकुमारने केला. त्यांनी बोरिवलीमधील संजय गाधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुजिककुमारने कामावरून सुट्टी घेतली आणि कुटुंबासह बोरिवलीला पोहोचला.
शेवटची सफारी…
सुजितकुमार कुटुंबासह दुपारी २.३० वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचला. त्यांनी सफारीचे तिकिट काढले. सुजित कुमार, पत्नी राजकुमारी आणि चुलत भाऊ शिवम दुपारी ३ च्या सुमारास आडोशाला बसलो होते. मानसी राष्ट्रीय उद्यान बंधारा आणि वाघ, सिंहांचा पिंजरा असलेल्या रस्त्याच्या बाजूला खेळत होती. त्याच वेळी भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने मानसीला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या मानसीला त्वरित उपारासाठी कांदिवलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.
चालक फरार, गुन्हा दाखल
मानसीला धडक दिल्यानंतर दुचाकीचालक फरार झाला. त्याची ओळख पटली आहे. तो राष्ट्रीय उद्यानातील रावणपाडा येथे वास्तव्यास आहे. याप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (अ), २८१, १०६ (१), तसेच मोटार वाहन अधिनियमाच्या कल १३४ (अ), १३४ (ब) आणि १८४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.