मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाने बाळकुम येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किंमतीत १६ लाखांची वाढ केली असून या दरवाढीवरून वाद सुरू आहे. अखेर आता राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. गृहनिर्माण विभागाने याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण मंडळाला दिले आहेत.
कोकण मंडळाने २०१८ च्या सोडतीतील बाळकुम प्रकल्पातील १२५ घरांसह २०००मधील लाभार्थ्यांसाठी असलेल्या ६९ घरांच्या किंमतीत १६ लाखांची वाढ केली. त्यामुळे घरांची किंमत ४३ लाखांवरून ५९ लाख अशी झाली. कोकण मंडळाने व्याज, पाणी पुरवठा, वाहनतळ आणि मेट्रो उपकराचा भार टाकल्याने किंमतीत वाढ झाली. हा प्रकार ‘लोकसत्ता’ने चव्हाट्यावर आणला. विजेत्यांनी आणि लाभार्थ्यांनी या दरवाढीस विरोध करून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. मात्र कोकण मंडळाने किंमत कमी करता येणार नाहीत अशी भूमिका घेतली.
या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून विजेते आणि लाभार्थी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल अखेर गृहनिर्माण विभागाने घेतली असून कोकण मंडळाकडून यासंबंधीचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सरकारच्या आदेशानुसार लवकरच अहवाल सादर करू असेही त्यांनी सांगितले. आता सरकारने दखल घेतल्याने विजेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सरकारकडून न्याय मिळेल आणि किंमत कमी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
म्हाडाला कायदेशीर नोटीस
घरांच्या किंमतीतील दरवाढीचा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. किंमत कमी करण्यास नकार देणाऱ्या म्हाडाच्या कोकण मंडळाला आता विजेत्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नियमांचा भंग करून किंमत वाढविण्यात आली आहे. तसेच चार वर्षांपासून घराचा ताबा रखडला आहे. यामुळे विजेत्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला आहे.