मुंबई : हार्बर मार्गावरील चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या समांतर रस्ता फाटक खुले राहिल्याने, लोकल सेवा खोळंबली. गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास फाटकात तांत्रिक बिघाड झाला आणि ते बंद होण्यास अडचण निर्माण झाली. हे फाटक सुमारे १५ मिनिटे खुलेच होते. परिणामी, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली.
फाटक खुले राहिल्यामुळे हार्बर मार्गावरील सीएसएमटी – वडाळा आणि वाशी – कुर्ला दरम्यान अनेक लोकल एका मागे एक उभ्या होत्या. त्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बिघाड दुरूस्त करून दुपारी ४.१५ वाजता फाटक बंद केले. त्यानंतर लोकल मार्गस्थ होण्यास सिग्नल मिळाला. मात्र या घटनेमुळे हार्बर मार्गाचे वेळापत्रक कोलमडले. गुरुवारी सायंकाळी कार्यालयातून घर निघालेल्या प्रवाशांना प्रचंड उशीर झाला. सायंकाळी ५ च्या दरम्यान सीएसएमटी स्थानकात उशिरा लोकल येत होत्या. तसेच काही लोकल रद्द करण्यात आल्या.