मुंबई :  महाड, चिपळूण,  सांगली येथील पूरग्रस्त भागात मदत कार्य करुन मुंबई महानगरपालिके चे  सुमारे ४०० अधिकारी व कर्मचारी मुंबईत परतले आहेत. या सर्वांची विशेष आरोग्य तपासणी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी १४५ कर्मचारम्यांची तपासणी मरोळ स्थित सेव्हन हिल्स रुग्णालयात करण्यात आली.

महाड, चिपळूण आणि सांगली येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मदत कार्य करण्यासाठी सुमारे ४०० अधिकारी — कर्मचारी पाठविण्यात आले होते. महाड येथे ११५, चिपळूण येथे २१७ आणि सांगली येथे ८९ असे ४२१ अधिकारी व कर्मचारी मदत कार्यासाठी गेले होते. मदत कार्य पूर्ण करुन हे पथक परतले आहे. या सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर घेण्याची सूचना आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्त  काकाणी यांनी केली आहे. त्यानुसार उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.