मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्री सुरू झालेले पावसाचे धारानृत्य मंगळवारी सकाळीही सुरूच होते. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झाले. परिणामी, मुंबईतील काही भागांतील रस्ते जलमय झाल्याने वाहतूक मंदावली. तर जलमय झालेल्या काही रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली. त्यामुळे काही भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला.

सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने सखलभाग जलमय होण्यास सुरुवात झाली. परिणामी, मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास वरळी सागरी सेतू, ताडदेव येथील महालक्ष्मी जंक्शन आणि गमाडिया जंक्शन यासह अन्य काही भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली. यासह आयबी पटेल पेट्रोल पंप, पश्चिम द्रुतगती मार्गावरील उत्तरेकडे जाणारी वाहतूक, नेताजी पालकर चौक येथील वाहतूक, एवरार्ड नगर येथील दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली.

मुंबईत संततधार कोसळू लागताच हिंदमाता, सक्कर पंचायत, शीव रस्ता क्रमांक २४, शेख मिस्त्री दर्गा मार्ग यासह अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. परिणामी, वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली. तसेच नागरिकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी जलमय झालेल्या परिसरात धाव घेऊन पाणी उपसा करणारे पंप कार्यान्वित करून सखलभागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र संततधार पावसामुळे सखलभागात साचलेल्या पाण्याचा निचरा संथगतीने होत होता.