लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती तयार करणे, विक्री करणे आणि विसर्जन करण्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वांननुसार बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही मार्गदर्शक त्तत्वे योग्य ठरवली आहेत. त्यामुळे, माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे पर्यावरणाची हानी करणाऱ्या पीओपीने बनवलेल्या मूर्तींचे नैसर्गिक जलशयांत विसर्जन आणि उत्सवांत अशा मूर्तींची विक्री यावर पूर्ण बंदी आहे. या मार्गदर्शक तत्त्वांची माघी गणेशोत्सवादरम्यान काटेकोर अंमबजावणी करण्याचेही मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने यंत्रणांना बजावले.

यावेळी माघी गणेशोत्सवासाठी आधीच पीओपीच्या गणेशमूर्तींची विक्री झाली असल्याचे मूर्तीकारांच्या संघटनेनच्या वतीने न्यायालयालाला सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच. शाडूच्या मूर्तीमुळे अधिक पर्यवरणीय समस्या निर्माण होत असल्याचे शास्त्रोक्तदृष्ट्या स्पष्ट झाल्याचा दावाही केला. तथापि, सीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे अंमलात असताना मूर्तीकार पीओपीच्या मूर्ती का तयार करतात, असा प्रश्न न्यायालयाने केला. तसेच, प्रत्येकवेळी मूर्तीकारांकडून उपजीविकेचा प्रश्न उपस्थित केला जात असल्याची टिप्पणी करून सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यापासून अंतरिम दिलासा देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी, मूर्तीकारांचे जे काही म्हणणे असेल ते ऐकले जाईल, असे नमूद करून न्यायालयाने त्यावरील सुनावणी २० मार्च रोजी ठेवली.

तत्पूर्वी, सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जाईल, असे आश्वासन यंत्रणांनी ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या वेळी न्यायालयाला दिले होते. असे असताना माघी गणेशोत्सवासाठीही मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती तयार करून त्या विकल्या जात असल्याची बाब याचिकाकर्ते रोहित जोशी यांच्यातर्फे वकील रोनिता भट्टाचार्य यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तर, सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जात असल्याचा दावा मुंबई महापालिकेसह अन्य यंत्रणांनी केला. न्यायालयाने सगळ्या पक्षकारांच्या बाजू ऐकल्यानंतर माघी गणेशोत्सवास पीओपीच्या मूर्तींची विक्री करू देऊ नका, ती झाली असल्यास त्या मूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश यंत्रणांना दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court orders no sale or immersion of pop ganesh idols for maghi ganeshotsav mumbai print news mrj