मुंबई : ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ, पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून शिक्षकांना देण्यात येणाऱ्या आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारचे नाव ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ करण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे.राज्यातील विद्यापीठे, पारंपरिक व अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि चित्रकला, उपयोजित कला संस्थांमधील शिक्षकांना दरवर्षी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ५ सप्टेंबर रोजी, शिक्षक दिनी गौरविण्यात येते. शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. मात्र यापुढे या पुरस्काराचे नाव ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ असे करण्यात आले आहे.

या पुरस्काराच्या अटी, निकष, निवड प्रक्रिया कार्यपद्धतीत बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात शिक्षक दिनी त्याबाबत अध्यादेश प्रसिद्ध करून पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. लवकरच त्यासंदर्भातील प्रस्ताव मागवून येत्या जानेवारी महिन्यात संबंधित पात्र शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शासनाने सेवाप्रवेश नियमानुसार नियुक्त केलेल्या शिक्षकाने नियमित वर्ग अध्यापनाचे कार्य केलेले असावे. अध्यापनाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात प्रतिनियुक्तीवर गेलेले शिक्षक पुरस्कारासाठी अपात्र राहतील. याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित संस्थेचे प्राचार्य, अधिष्ठाता किंवा संचालक देतील. शिक्षकाने कमीत कमी १५ वर्षांची अध्यापन सेवा केलेली असावी, याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित संस्थेचे प्राचार्य, अधिष्ठाता किंवा संचालक देतील.

कोण ठरणार अपात्र

डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक हे पुन्हा अशा पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत. सेवानिवृत्त झालेले शिक्षक, विभागीय चौकशीत दोषी आढळलेले, विभागीय चौकशी प्रलंबित असलेले शिक्षक, शिक्षकाविरुद्ध फौजदारी कारवाईत शिक्षा झालेले, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले शिक्षक, खासगी शिकवणी करीत असलेले शिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत.

अटींचा भंग केल्यास कारवाई

प्राथमिक अटीचा भंग झाल्यास, पुरस्कार व अनुषंगिक सोयी-सुविधा परत घेण्यात येतील व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. प्राचार्यांनी अर्ज करताना त्यांची प्राचार्य पदावरील किमान सेवा ३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.