युती असूनही भाजपा अगदी पूर्वीपासून ‘शत प्रतिशतचा’ नारा देत आहे. त्यामुळे आता शिवसेनेने स्वबळाची भाषा केली तर त्यामध्ये गैर ते काय, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात यासंदर्भात पक्ष नेतृत्त्वाकडून सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. शिवसेनेच्या मुंबई येथे पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत शेतमजुरापासून महिलांपर्यंत आणि हिंदुत्वापासून शत प्रतिशत शिवसेनेचे राज्य आणण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. भाजपाने ‘शत प्रतिशत’चा नारा याआधीच दिला आहे. अगदी प्रमोद महाजन यांनी ही गर्जना केली तेव्हा त्यांना हा प्रश्न का विचारला गेला नाही की, ‘काय हो प्रमोदजी, आपली तर शिवसेनेबरोबर युती आणि मैत्री आहे. महाराष्ट्रात व देशातील सत्तेत तुम्ही ‘साथ साथ’ आहात. तरीही शिवसेनेस टांग मारून शत प्रतिशतचा नारा देणे हा काय प्रकार? मात्र, असले दळभद्री प्रश्न शिवसेनेच्याच वाट्याला येत राहिले, असे अग्रलेखात म्हटले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी आत्तापासूनच लोकसभेच्या ३८० जागा जिंकण्याचा अश्वमेधी घोडा फिरवायला सुरुवात केली आहे. म्हणजे पाचशे-साडेपाचशे जागा देशभरात घुसळतील तेव्हाच ‘३८०’ ग्रॅम विजयाचे लोणी तागडीत पडेल ना! मग त्यांच्याबरोबर जे ‘एनडीए’ म्हणून घटक पक्ष आहेत त्यांना टांग मारूनच ३८० चा ‘गनिमी कावा’ खेळला जात असेल तर शिवसेनेने लोकसभा, विधानसभेचे स्वबळी रणशिंग फुंकले तर इतकी भिरभिरी यायचे कारण काय?, असा सवाल शिवसेनेने भाजपाला विचारला आहे.
शिवसेनेने मंगळवारी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी तात्काळ नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा तयार आहे. यात नुकसान झालं तर ते शिवसेनेचंच होईल, असे भाजप नेत्यांनी म्हटले होते. भाजप नेत्यांच्या या विधानांना अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
आम्हाला राजकीय नफ्या-तोट्यांची चिंता कधीच वाटली नाही. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हाही ‘तिकडे मोगलांचे राज्य आहे. ते केवढे विराट आहे. दक्षिणेकडील राज्ये किती मोठी आहेत. त्यांच्याकडे अफाट धनसंपत्ती आहे. पण शिवाजी राजांजवळ सैनिकांचे पगार द्यायला पैसे नाहीत. हे कसली स्वराज्याची स्थापना करतात? यांच्या मागे कोण येतो,’ असे महाराष्ट्रातील वतनदार, जहागीरदार व सुभेदार म्हणत होते. मात्र, तरीही शिवाजी महाराजांनी आपले कार्य पुढे नेले. शिवसेनाप्रमुखांनादेखील शिवाजी राजांप्रमाणेच विरोध झाला आणि त्याच विरोधाची शिदोरी आमच्याही हाती पडली आहे. विरोध पत्करूनही जो सत्कार्यावर विश्वास ठेवतो तो कार्य सिद्धीला तर नेतोच. त्याच ऐतिहासिक मार्गावरून शिवसेना पुढे निघाली आहे. संकटांची व अडथळ्यांची पर्वा आम्हाला नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.