कोव्हॅक्सीन लसीकरणाचे शहरातील एकमेव केंद्र असलेल्या जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला  मंगळवारी अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून यादीतील १०० लाभार्थ्यांपैकी केवळ १३ आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी आले. जे.जे.सह कामा आणि जीटी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना जेजेतील लसीकरण केंद्रावरच पाठविण्याचा प्रस्ताव रुग्णालयाने राज्य आरोग्य विभागाकडे सादर के ला आहे.

कोव्हॅक्सीन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून वैद्यकीय चाचण्याअंतर्गत आपत्कालीन वापरास परवानगी दिलेली आहे. परंतु लशीची परिणामकता आणि सुरक्षितता याबाबत साशंकता असल्याने अजूनही  आरोग्य कर्मचारी लस घेण्यास कचरत आहेत. पहिल्या दिवशी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी लस घेऊन कार्यक्रमाला सुरूवात केली. त्यानंतर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी पुढाकार घेत लस घेतल्याने पहिल्या दिवशी लसीकरण झालेल्यांची संख्या ३९ नोंदली गेली. परंतु मंगळवारी सकाळी ९ पासूनच लसीकरण कक्षात शुकशुकाट होता. दिवसभरात १३ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असून तेही रुग्णालयातील कर्मचारी होते.

काल मला लसीकरणासाठी येण्याचा संदेश आला, तेव्हापासून मी काय करावे या संभ्रमात होतो. लस घ्यावी की नाही असा विचार सकाळपर्यत सुरू होता. जीटी रुग्णालयातील माझ्या सहकाऱ्याने लस घेण्याचा सल्ला दिला. माझ्या कार्यालयातील काही लोक लस घेऊन आले. त्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला, म्हणून मग मी दुपारी लस घ्यायला आलो. लस घेतल्यावर काहीही त्रास झालेला नाही, असे मत जे.जे. रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

जे.जे. समूहातील सुमारे ७७५० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या रुग्णालयात लसीकरणासाठी पाठविण्याऐवजी जेजेमध्येच पाठवावे. त्यानुसार अ‍ॅपमध्ये दररोज यादी तयार करावी, असा प्रस्ताव राज्याच्या आणि पालिकेच्या लसीकरण विभागाकडे मांडला आहे. याला मंजुरी मिळण्याची शक्यता असून त्यानुसार येथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण जेजेमध्येच केले जाईल, अशी माहिती डॉ. संख्ये यांनी दिली.  यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड आणि राज्याच्या कर्मचाऱ्यांना कोव्हॅक्सीन हा भेदभाव का, असा आक्षेप काही कर्मचाऱ्यांनी नोंदविला आहे.

संभ्रमामुळे प्रारंभी अल्प प्रतिसाद

पहिल्या दिवशी लस घेतलेल्या अनेकांची नावे मंगळवारी दिलेल्या यादीत होती. काही नावे दोनदा आलेली आहेत. तसेच यादीतील काही जण आजारी आहेत. त्यामुळेही ते येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आकडय़ांवरून परीक्षण करणे योग्य नाही. या लशीबाबत अनेक संभ्रम असल्याने सुरुवातीला हे घडणे अपेक्षित आहे. परंतु जसजसे कर्मचारी लसीकरणाला येतील तसतसे लोकांमधील विश्वास वाढेल. शनिवारी लस घेतलेल्यांपैकी एकालाही सौम्य दुष्परिणामही जाणवलेले नाहीत. मीही आज लस घेतली असून सकाळपासून काम करत असल्याचे रुग्णालयातील सामाजिक औषधशास्त्र विभागाचे डॉ. ललित संख्ये यांनी सांगितले.

‘लाभार्थ्यांनी औषधोपचारांची माहिती द्यावी’

इम्युनोसप्रेस औषधे घेणारे तसेच केमोथेरपीसह उपचार सुरू असलेल्या कर्करुग्णांना ही लस घेता येणार नाही, असे पुन्हा एकदा भारत बायोटेक कंपनीने मंगळवारी अधोरेखित केले आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या लाभार्थ्यांनी सध्या सुरू असलेल्या औषधांची योग्य माहिती देणे गरजेचे आहे, असे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.