मधु कांबळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी व दक्षिण-मध्य मुंबई या तीन मतदारसंघांवरून निर्माण झालेला तिढा कायम आहे. या तीन मतदारसंघांवर दावा करणाऱ्या काँग्रेसला शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी एकाकी पाडल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसने या तिन्ही मतदारसंघांवरचा दावा कायम असल्याचे सांगितले, परंतु त्यावर शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौन धारण करणे पसंत केले. त्यावरून महाविकास आघाडीत सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस यांच्यात सांगली मतदारसंघाचा वाद विकोपाला गेला आहे. भिवंडीवर राष्ट्रवादीने दावा केला आहे, त्यालाही काँग्रेसचा विरोध आहे. दक्षिण-मध्य मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसला हवा; परंतु या जागेवरही शिवसेनेने हक्क सांगितला असून, अनिल देसाई यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. काँग्रेसने कितीही संताप व्यक्त केला तरी शिवसेना त्याची कसलीही दखल घ्यायला तयार नाही.

हेही वाचा >>>कामा रुग्णालयामध्ये सुरू होणार नऊ नवे विभाग; मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई व रायगडमधील रुग्णांना दिलासा मिळणार

वाद दिल्लीत

सांगली व भिवंडीचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला; परंतु काही झाले तरी आघाडीत बिघाड निर्माण होऊ द्यायचा नाही, अशी काँग्रेस नेतृत्वाची भूमिका असल्यामुळे राज्यातील नेत्यांची पंचाईत झाल्याचे सांगितले जाते. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची गुरुवारी हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक होती. कोणकोणत्या मुद्दय़ांवर भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात प्रचार करायचा यावर चर्चा झाली. मात्र तरीही या बैठकीत सांगली, भिवंडी, दक्षिण-मध्य मुंबई हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे राहिले पाहिजेत, असा आग्रह धरल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. परंतु बैठकीत त्यावर काही चर्चा झाली नाही. प्रामुख्याने निवडणूक प्रचाराचे नियोजन, त्याबाबतचे सादरीकरण यावरच प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. प्रचाराच्या नियोजनाबाबत ही बैठक होती, त्यामुळे इतर कोणत्या विषयावर चर्चा झाली नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mahavikas aghadi three constituencies namely sangli bhiwandi and south central mumbai are contested amy