मुंबईः मोबाइल घेऊन पळून गेल्याच्या रागातून दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना साकीनाका परिसरात घडली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पिता-पुत्राला अटक केली. रस्त्यावर पाडून तरूणाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्या असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशोक अविनाश तुळसे (३०) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो साकीनाका येथील अशोक नगर परिसरातील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, अशोक तुळशे हा आरोपी सुरेश भगवान दुनघव यांचा मोबाइल घेऊन पळून गेला होता. त्यामुळे संतापलेल्या सुरेश व त्याचा मुलगा लक्ष्मण दुनघव यांनी त्याला साकीनाका येथील काजूपाडा परिसरात गाठला. त्यानंतर त्यांनी लाथा-बुक्क्यांनी अशोक तुळशेला मारहाण केली. त्यावेळी त्यांनी त्याला रस्त्यावर ढकलून दिले. त्यामुळे त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आणि अशोक बेशुद्ध झाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकणी मृत अशोक तुळशे याचा भाऊ आकाश तुळशे (२४) याने पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्याच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३ (५) अंतर्गत पिता-पुुत्र सुरेश व लक्ष्मणविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. सुरेशचा मोबाइल घेऊन पळून गेल्याच्या रागातून सुरेश व त्याचा मुलगा लक्ष्मण याने अशोकला मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून आरोपींचा शोध घेतला. त्या दोघांनाही अशोक नगर परिसरातून अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपी व मृत व्यक्ती तिघेही साकीनाका येथील अशोक नगर परिसरातील रहिवासी आहेत. अशोक शनिवारी सुरेशचा मोबाइल घेऊन पळून गेला होता. ही बाब सुरेशने मुलगा लक्ष्मणला सांगितली. त्यानंतर दोघेही अशोकला शोधत होते. त्यांना तो काजूपाडा येथील कंट्रीबार समोरील रस्त्यावर सापडला. दोघांनीही त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांना त्याला मारहाण केली. त्यावेळी झटापटीत धक्का दिल्यामुळे तो खाली कोसळला. यावेळी अशोकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे तो बेशुद्ध झाला. अशोकचा मृत्यू डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाल्याचा अंदाज वैद्यकीय तपासणीत व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी न्याय वैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून रक्ताचे नमुने व इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत. याप्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 30 year old person died dispute over mobile phone mumbai print news css