मुंबई : मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन १३१ वर्षे जुना बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. पुढील १८ महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल. या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पावसाळ्यात ‘रिमोट कंट्रोल्ड व्हिज्युअल फ्लोट कॅमेऱ्या’ने भुयारी गटारांची पाहणी करणार, पावसाळ्यात पश्चिम रेल्वे सज्ज

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल जुलै २०१८ रोजी कोसळला. त्यानंतर आयआयटी, मुंबई या संस्थेतील तज्ज्ञांमार्फत मुंबईतील सर्व पुलाची संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत मुंबई सेंट्रल – ग्रॅंट रोडदरम्यानचा बेलासिस पूल धोकादायक असल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर त्या पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करणार आहे. पुलाच्या जोडरस्त्याची उभारणी मुंबई महापालिका करणार आहे. बेलासिस पुलावरील पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरू असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.