मुंबई : मालवणी पोलीस ठाण्यातील चार पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या पोलिसांची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. त्यात हे पोलीस कर्तव्य बजावत असताना पैसे घेत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याची दखल घेत या चौघांना निलंबितन करण्यात आले आहे. यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी मालवणी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रदीप कदम यांची एक चित्रफित व्हायरल झाली होती. ते कर्तव्य बजावत असताना पैसे घेत असल्याचा दावा या चित्रफितीत करण्यात आला होता. अशाच प्रकारची आणखी एक चित्रफित १८ सप्टेंबर रोजी व्हायरल झाली होती. त्यात मालवणी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संजय रासकर, विकास माळी आणि महेंद्रकुमार मराळ हे पैसे घेत असल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे खळबळ उडाली होती.
पोलीस उपायुक्तांनी केले निलंबित
या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस उपायुक्तांनी या चारही पोलिसांना निलंबित केले. अशा कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याचे उपायुक्तांनी सांगितले. या चारही पोलिसांची सध्या विभागीय पोलीस चौकशी सुरू आहे.
यापूर्वीच्या पोलीस निलंबनाच्या काही घटना
जून २०२५ – खेरवाडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक जालंधर जाधव, हवालदार विशाल अशोक जाधव आणि करमचंद्र प्रभाकर दुबे यांनी एका आर्थिक वादाची तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले होते.
जून २०२५ – अंंधेरीतील ”डान्स बार” अवैधपणे रात्री उशिरापर्यंत सुरू असताना कारवाई करण्यात अपयश आल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण निलंबित.
जून २०२५ – खेरवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्याच्या वेळेनंतर खासगी आर्थिक वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जालंधर जाधव (सहाय्यक निरीक्षक), विशाल अशोक जाधव (हवालदार), करमचंद्र प्रभाकर दुबे (हवालदार) निलंंबित.
जुलै २०२५ – मीरा – भाईंदर – वसई, विरार परिसरातील कथित अंमली पदार्थ विक्रेत्याला कारवाई न करता सोडून दिल्याबद्दल पोलीस हवालदार अनिल सुर्वे निलंबित.
मे २०२५ – प्रवशांच्या बॅगा तपासणीच्या नावाखाली त्यांच्याकडून खंडणी उकळून आर्थिक लूट करण्याचे प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी आता पर्यंत १३ पोलिसांना निंलंबित करण्यात आले असून ४ पोलिसांना अटक करण्यात आली आहे.
ऑगस्ट २०२५ – रेल्वे प्रवाशाकडून ५ हजारांची खंडणी उकळल्याप्रकऱणी ३ पोलिसांना निलंबित करण्यात आले.
ऑगस्ट २०२५ – एका व्यावसायिकावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्या जमिनीचा ताबा दुसऱ्या व्यक्तीला दिल्याप्रकरणी वसईतील वालीव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे निलंबित.
सप्टेंबर २०२४ – एका व्यावसायिकाच्या सहकाऱ्याच्या खिशात अंमली पदार्थ ठेवल्याच्या आरोपावरून खार पोलीस ठाण्याचे एक उपनिरीक्षक आणि तीन हवालदार निलंबित.