मुंबई : कर्करोग रुग्णांच्या अन्य आजारांवर उपचार करण्यासाठी व त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी टाटा रुग्णालय खारघरमधील ॲक्ट्रेक्ट येथे पहिले अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करणार आहे. यामुळे कर्करोगावर उपचार घेत असलेल्या हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड यांसारख्या आजाराने त्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करताना त्यांना देण्यात येणाऱ्या किमोथेरपीमुळे हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड यांसारख्या विविध अवयवांवर केमोथेरपीचा परिणाम होतो. तसेच त्यांना रक्तदाब, मधूमेह यांसारख्या सहव्याधींनाही सामोरे जावे लागते. अशावेळी या रुग्णांना अन्य आजारांवरील व अवयवांवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात अन्य रुग्णालयामध्ये उपचाारासाठी पाठविण्यात येते. त्यामुळे रुग्णांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन टाटा रुग्णालयाने खारघर येथील ॲक्ट्रेक येथे १२ मजली अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. १५० खाटांचे हे रुग्णालय पुढील तीन वर्षांत उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयामध्ये विविध आजरांमुळे निर्माण होणारी गुंतागुंत दूर करण्यासाठी स्वतंत्र विभाग असतील. ॲक्ट्रॅकअंतर्गत असलेल्या या रुग्णालयामुळे रुग्णांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामावर उपचार करणे व त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असल्याचे ॲक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले.

अतिविशेषोपचार रुग्णालयाबरोबरच टाटा रुग्णालयाकडून रुग्णांची काळजी घेणे, संशोधन वाढविणे आणि उपचार सुविधा सुधारणे यावरही भर देण्यात येणार आहे. त्यासाठी ३०० रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी मोफत किंवा अनुदानित राहण्याच्या व्यवस्थेबरोबर २२० मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी ११ मजल्यांचे सेंट ज्युड्स चिल्ड्रन्स कॅन्सर सेंटर २०२५ च्या मध्यापर्यंतत सुरू करण्यात येणार आहे.

रक्त कर्करोगग्रस्तांसाठी स्वतंत्र युनिट

रक्त कर्करोगाने ग्रस्त असलेली लहान मुले आणि प्रौढांसाठी ४०० खाटांचे स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार आहे. हे रुग्णालय डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रक्त कर्करोग बरा होणाऱ्या कर्करोगांपैकी एक असल्याने या नवीन युनिटद्वारे अधिकाधिक मुलांना त्याचा लाभ मिळवून देण्यास मदत होईल, असे ॲक्ट्रेकचे उपसंचालक डॉ. नवीन खत्री यांनी सांगितले.

सर्वात मोठ्या रेडिएशन केंद्राची निर्मिती

ॲक्ट्रेक येथे भारतातील सर्वात मोठ्या रेडिएशन थेरपी केंद्राची निर्मिती सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे (सीएसआर) करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात मोठ्या अणू औषध उपचार केंद्रांपैकी एक रेडिओलॉजिकल रिसर्च युनिट उभारण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये ४१ विशेष उपचार खाटा असणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai tata hospital to start super specialty hospital for cancer patients mumbai print news css