मुंबई : देशातील रब्बी हंगामातील एकूण पेरणी क्षेत्रात गतवर्षापेक्षा दहा लाख हेक्टरने वाढ झाली. तेलबियाचे क्षेत्र कमी होऊन, गव्हाची पेरणी सहा लाख हेक्टरने वाढून ३२४ लाख हेक्टरवर पोहचली. तेलबिया, कडधान्यांची हमीभावाने खरेदी न झाल्याचा परिणाम पेरणीवर दिसून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या तेलबिया आणि कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची घोषणा फसली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील रब्बी हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र ६३५.३० लाख हेक्टर आहे. गत हंगामात ६५१.४२ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदाच्या रब्बी हंगामात जानेवारीअखेर ६६१.०३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत २५ लाख हेक्टरने, तर गत वर्षाच्या तुलनेत दहा लाख हेक्टरने वाढ झाली आहे.

यंदा उच्चांकी गहू लागवड झाली आहे. देशातील गहू लागवडीचे सरासरी क्षेत्र ३१२.३५ लाख हेक्टर आहे. गतवर्षी ३१८.३३ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा ३२४.८८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. ही देशातील आजवरची उच्चांकी गहू लागवड आहे. सरासरीच्या तुलनेत १२.५३ लाख हेक्टरने तर, गतवर्षाच्या तुलनेत ६.५५ लाख हेक्टरने गहू लागवड वाढली आहे. उन्हाळी भाताचे देशातील सरासरी क्षेत्र ४२.०२ लाख हेक्टर आहे. गतवर्षी ४०.५९ लाख हेक्टरवर लागवड झाली होती, यंदा ४२.५४ लाख हेक्टवर लागवड झाली आहे.

डाळी, कडधान्यांची एकूण लागवड १४०.८९ लाख हेक्टरवर गेली आहे. कडधान्यांचे सरासरी क्षेत्र १४०.४४ लाख हेक्टर आहे. गतवर्षी १३७.८० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. रब्बी हंगामात हरभरा या प्रमुख कडधान्यांचे उत्पादन देशभरात घेतले जाते. हरभरा लागवडीचे सरासरी क्षेत्र १००.९९ लाख हेक्टर आहे. यंदा ९८.५५ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मसूराची १७.४३ लाख हेक्टर, वाटाण्याची ७.९४ लाख हेक्टर, कुळीथाची २ लाख हेक्टर, उडीद ६.१२ लाख हेक्टर, मुगाची १.४० लाख हेक्टर, लाखेची (लतरी) २.८० लाख हेक्टर आणि अन्य डाळींची ४.६५ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. केंद्र सरकारने प्रयत्न करूनही कडधान्य लागवडीत फारशी वाढ झालेली नाही.

श्रीअन्न म्हणजे तृणधान्यांची लागवड ५५.२५ लाख हेक्टरवर झाली आहे. त्यात ज्वारीची २४.३५, बाजरीची ०.१४, नाचणीची ०.७३, लहान तृणधान्यांची ०.१६, बार्लीची ६.२० आणि मक्याची २३.६७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मका लागवडीत सुमारे दोन लाख हेक्टरने वाढ झाली आहे. मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिल्यामुळे मका लागवड वाढली आहे.

तेलबिया मिशनला फटका

केंद्र सरकार तेलबियांच्या लागवडीवर भर देत असले तरीही तेलबियांना हमीभाव मिळत नसल्यामुळे तेलबियांची लागवड गत वर्षाच्या तुलनेत घटली आहे. गतवर्षी ९९.२३ लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड झाली होती. यंदा ९७.४७ लाख हेक्टवर झाली आहे. रब्बीत मोहरी हे प्रमुख तेलबिया पीक घेतले जाते. गतवर्षी ९१.८३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदा ८९.३० लाख हेक्टरवर झाली आहे. त्या खालोखाल भुईमूगाची ३.६५, सूर्यफूलाची ०.७४, करडईची ०.७२, तिळाची ०.४२, जवसाची २.२६ आणि अन्य तेलबियांची ०.३९ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in rabi crop sowing in the country mumbai print news asj