मुंबई : भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या साहाय्याने होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये भारताने अलिकडच्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे. यामुळे वैद्यकीय उपचार अधिक अचूक, सुरक्षित आणि परिणामकारक ठरू लागले असून भारत लवकरच रोबोटिक प्लस एआय सर्जरीत आशियातील आघाडीचा देश होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

सध्या देशात ९० पेक्षा अधिक प्रगत रोबोटिक सर्जिकल यंत्रणा कार्यरत असून याता काही विशिष्ठ आंतरराष्ट्रीय कंपन्यांचीच मक्तेदारी दिसून येते. दिल्लीतील एम्सपासून ते पुण्या- मुंबईती मोठ्या रुग्णालयांमध्ये या प्रणालीचा वापर करण्यात येतो. भारतात २०२२ पासून आतापर्यंत २५ हजाराहून अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. यामध्ये यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी, गाईनी, कार्डिओथोरॅसिक आणि न्यूरोसर्जरी यांचा मोठा वाटा आहे.या यशस्वी वाटचालीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता हस्तक्षेप हा निर्णायक ठरत आहे. सध्या एआय चा वापर केवळ सर्जरीदरम्यान नव्हे तर त्याआधी आणि नंतरच्या संपूर्ण वैद्यकीय प्रक्रियेत केला जात आहे.

स्कॅन डेटा, वैयक्तिक वैद्यकीय इतिहास, जीनोमिक माहिती यांच्या आधारे एआय सर्जरीचे नियोजन करते. एआय सर्जिकल प्लॅनिंग सिस्टीम्स डॉक्टरांना रिअल टाइम मार्गदर्शन करतात आणि गुंतागुंतीच्या निर्णयांमध्ये मदत करतात. यामुळे ऑपरेशनच्या अचूकतेत २८ टक्के वाढ आणि रुग्णाच्या रुग्णालयात राहण्याच्या कालावधीत सरासरी अडीच दिवसांची घट झाल्याचे फॉर्टिज हेल्थकेअरच्या एआय सर्जिकल रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

इंडियन ब्रॅण्ड इक्विटी फाऊंडेशनच्या ताज्या अंदाजानुसार, भारतातील रोबोटिक आणि एआय वैद्यकीय उपकरणांचा एकत्रित बाजार २२०२२ मध्ये ६२० कोटींचा होता तो २०२८ पर्यंत १९ टक्के वार्षिक वृद्धीदराने वाढून २,१०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या पीएलआय योजनेचा मोठा वाटा आहे. सरकारने मेडटेक क्षेत्रासाठी खास धोरण जाहीर करून स्वदेशी तंत्रज्ञान प्रोत्साहन दिले आहे. याचाच परिणाम म्हणून भारतीय स्टार्टअप्स आणि संशोधन संस्था आता एआय सर्जिकल तंत्रज्ञान विकसित करत आहेत. एम्स, पीजीआयएमइआर, केईएम आदी आघाडीच्या वैद्यकीय शिक्षण संस्थांनी रोबोटिक सर्जरीसाठी विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. एम्स दिल्ली येथे २०२३ मध्ये ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक सर्जरी’ ची स्थापना करण्यात आली असून दरवर्षी १०० हून अधिक सर्जनना येथे प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही या नवतंत्रज्ञानाची ठोस पायाभरणी होत आहे. रोबोटिक सर्जरी ही निश्चितच क्रांतिकारक पद्धत आहे मात्र भारतात पुरेसं प्रशिक्षण नसल्यामुळे सर्जन्सची संख्या मर्यादित आहे. दरवर्षी केवळ ३००–५०० सर्जन्सना या सर्जरीचं प्रशिक्षण मिळत जे पुरेस नाही. अमेरिका आणि युरोपमध्ये हे प्रमाण भारताच्या दुपटीपेक्षा अधिक आहे. तसंच हे प्रशिक्षण अत्यंत खर्चिक असल्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्याची उपलब्धता कमी आहे.

तथापि, या सगळ्या प्रगतीची दुसरी बाजूही लक्षात घ्यावी लागेल. रोबोटिक आणि एआय सर्जरी सध्या फक्त महानगरांमध्ये केंद्रित आहे. लॅन्सेट कमिशन ऑन ग्लोबल सर्जरी अहवालानुसार भारतातील सुमारे ७० टक्के लोकसंख्येला अजूनही सुरक्षित आणि वेळेत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील रुग्ण अद्यापही पारंपरिक प्रणालींवर अवलंबून आहेत. ही दरी भरून काढण्यासाठी केंद्र सरकारला शासकीय आरोग्य व्यवस्थेत भरीव वाढ करावी लागेल. याशिवाय रोबोटिक सर्जरीची आर्थिक बाजूही सामान्य रुग्णांसाठी अडथळा ठरते. पारंपरिक शस्त्रक्रिया जिथे दीड दोन लाखांमध्ये होते, तिथे रोबोटिक सर्जरी तीन ते पाच लाखांपर्यंत खर्चिक ठरते. सध्या केवळ मोजक्याच विमा कंपन्या या सर्जरीचा पूर्ण खर्च कव्हर करतात. आयुष्मान भारतसारख्या सरकारी योजनांमध्ये ही सुविधा सध्या अत्यंत मर्यादित आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय उद्योगातील स्टार्टअप्स आणि संशोधक एआय आधारित शस्त्रक्रियांचे स्वदेशी सोल्युशन्स विकसित करत आहेत. बंगलोर, हैदराबाद व पुणे हे एआय सर्जिकल स्टार्टअप हब म्हणून उदयास येत आहेत. काही नवीन कंपन्यांनी एआय आधारित इमेजिंग, डायग्नोस्टिक्स, सर्जिकल प्लॅनिंग आणि रुग्ण विश्लेषणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. या तंत्रज्ञानाच्या जोरावर भविष्यात रुग्णांची तपासणी, निदान आणि शस्त्रक्रिया यामध्ये प्रचंड सुसूत्रता येईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.तंत्रज्ञान, प्रशिक्षण, धोरण आणि स्टार्टअप्सचा हा चौफेर विकास भारताला रोबोटिक प्लस एआय सर्जरीसारख्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्व देण्यास सज्ज करत आहे. आज एआय आणि रोबोट्स डॉक्टरांच्या मदतीने शस्त्रक्रिया करत असले तरी उद्या ही यंत्रणा स्वतःहून निर्णय घेऊन ऑपरेशन करेल, असा अंदाज जागतिक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भारत हे मेडिकल टुरिझमसाठी एक आघाडीचं केंद्र बनत आहे. पर्यटन मंत्रालयाच्या २०२४ च्या अहवालानुसार, भारतात वैद्यकीय कारणासाठी येणाऱ्या परदेशी रुग्णांपैकी १७ टक्के रुग्णांनी रोबोटिक सर्जरीसाठी भारताची निवड केली. कमी खर्च, प्रशिक्षित डॉक्टर, आणि अत्याधुनिक यंत्रणा यामुळे भारत हे एक ‘हेल्थटेक डेस्टिनेशन’ म्हणून उदयास येत आहे.शेवटी, रोबोटिक सर्जरीचं भविष्य भारतात उज्वल असलं तरी ते व्यापक वापरात यावं यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, स्वस्त सेवा, विमा संरक्षण, आणि ग्रामीण विस्तार यांचा समन्वय आवश्यक आहे. येत्या दशकात जर ही सर्व अंगांनी विकास घडवून आणला गेला, तर भारत रोबोटिक सर्जरीत जागतिक नेत्याच्या भूमिकेत पोहोचेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.