मुंबई : देशातून होणाऱ्या खाद्यतेल पेंडीचा (ऑईल मिल्स) निर्यातीत सुमारे बारा टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेत तयार होणाऱ्या आणि अत्यंत स्वस्तात जागतिक बाजारात उपलब्ध असलेल्या सोयाबीन पेंडीचा फटका भारतीय निर्यातीला बसला आहे. बिगर जणुकीय सुधारीत तेलबियांच्या पेंडीला असलेल्या मागणीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
देशातून बिगर जणुकीय सुधारीत सोयाबीन, मोहरी, भुईमूग, भाताच्या कोंड्यापासून खाद्यतेल उत्पादन केले जाते. प्रामुख्याने सोयाबीन, मोहरी आणि भाताच्या कोड्यांपासून तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पेंडीला आग्नेय आशियातून जास्त मागणी असते. त्या खालोखाल विविध प्रकारच्या प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांमध्ये प्रथिनांचा स्त्रोत म्हणून अमेरिकेतूनही बिगर जणुकीय सुधारीत पेंडीला मागणी असते.
यंदाचे चित्र काहीसे उलट दिसत आहे. अमेरिकेच्या कर धोरणाचे जागतिक बाजारावर विविध परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे भारतीय खाद्यतेल पेंडींना असलेली मागणी घटली आहे. ऑगस्ट २०२४ च्या तुलनेत ऑगस्ट २०२५ मध्ये भारतीय पेंडींच्या निर्यातीत बारा टक्क्यांनी घट झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये ३ लाख १४ हजार ३६३ टन पेंडीची निर्यात झाली होती, यंदाच्या ऑगस्टमध्ये २ लाख ७६ हजार ८३४ टन निर्यात झाली आहे. दक्षिण कोरिया, चीन, जर्मनी, बांगलादेश, फ्रांन्स या प्रमुख देशात भारतातून पेंडींची निर्यात होते. बिगर जणुकीय पेंडीचा खाद्य पदार्थात प्रथिनांचा स्त्रोत म्हणून वापर केला जातो.
भाताच्या कोंड्याच्या पेंडीवर निर्यात बंदी
देशान व्हिएतनाम, थायलंडसह अन्य आग्नेय आशियाई देशांना भाताच्या कोंड्याच्या पेंडीचा निर्याती होते. पण, केंद्र सरकारने या पेंडीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे ही निर्यात ठप्प झाली आहे. पशुखाद्यामध्ये या पेंडीचा वापर होतो. पशुखाद्यांच्या दरात झालेली वाढ स्थिर करण्यासाठी आणि देशात पुरेसे पशुखाद्य उपलब्ध होण्यासाठी निर्यात बंदी आहे. पण, तेल उद्योगातून ही निर्यात बंदी उठविण्याची मागणी आहे.
चीन मोहरीच्या पेंडीचा सर्वात मोठा आयातदार
पशुखाद्यासाठी मोहरीच्या पेंडीला देशांतर्गत बाजारात मोठी मागणी असते. पण, आता चीनमधून मोहरीच्या पेंडीला मागणी वाढली आहे. मोहरीच्या पेंडीचा मोठा ग्राहक म्हणून चीन समोर आला आहे. एप्रित ते ऑगस्ट २०२५ मध्ये चीनने भारताकडून ३ लाख ६८ हजार टन मोहरीच्या पेंडीची निर्यात झाली आहे. प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांमध्ये प्रथिनांचा स्त्रोत चीन मोहरीची पेंड आयात करीत आहे.
भाताच्या कोंड्याच्या पेंडीवरील निर्यात बंदी उठवा
देशात तयार होणाऱ्या बिगर जणुकीय सुधारीत पेंडीला मोठी मागणी आहे. पण, अमेरिकेच्या स्वस्तातील सोयाबीन पेंडीचा जागतिक बाजारात दबाव आहे. त्यामुळे निर्यातीत घट झाली आहे. भाताच्या कोंड्याच्या पेंडीवर असलेली निर्यात बंदी उठविण्याची गरज आहे, अशी माहिती द सॉल्व्हंट एक्स्ट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही. बी. मेहता यांनी दिली.