दोन महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री सपना गिल यांच्यामध्ये झालेल्या कथित झटापटीची चर्चा मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळाली होती. पृथ्वी शॉ व सपना गिलमध्ये मुंबईतल्या एका नाईट क्लबबाहेर सेल्फी काढण्यावरून वाद झाल्याचं समोर आलं होतं. यावेळी सपना गिलसमवेत तिच्या काही मैत्रीणीही होत्या, असं सांगण्यात आलं. या प्रकरणी आधी पृथ्वी शॉनं सपना गिलविरोधात गैरव्यवहाराची तक्रार केली होती. त्यावेळी सपना गिलला अटकही झाली होती. मात्र आता सपना गिलनं पृथ्वी शॉविरोधात केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त फ्री प्रेस जर्नलनं दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं होतं?

हा सगळा प्रकार मुंबईतल्या विले पार्ले पूर्वमध्ये असणाऱ्या बॅरेल मॅन्शन क्लबबाहेर घडला होता. सपना गिल आणि तिच्या काही मैत्रिणी पृथ्वी शॉबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यात बाचाबाची आणि पुढे धक्काबुक्की झाली. सपना गिल आणि तिच्या मैत्रिणींनी आपल्याशी गैरव्यवहार केल्याचा आरोप नंतर पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राने केला. त्यांनी याची रीतसर तक्रारही दाखल केली. या तक्रारीनंतर सपना गिलविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

चार दिवसांनंतर सपना गिलला जामीन मंजूर झाला. मात्र, आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण ज्या प्रकारे पृथ्वी शॉनं सपना गिलविरोधात तक्रार दिली होती, त्याचप्रकारे सपना गिलनंही पृथ्वी शॉविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, सपनानं थेट विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर पृथ्वी शॉविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त फ्री प्रेस जर्नलनं सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

IPL 2023: खराब फॉर्मवरुन वीरेंद्र सेहवागने पृथ्वी शॉचे टोचले कान, शुबमनचं उदाहरण देत म्हणाला…

काय म्हटलंय तक्रारीत?

या वृत्तानुसार सपना गिलनं आपल्या तक्रारीत पृथ्वी शॉनं विनयभंग केल्याचं नमूद केलं आहे. जीवघेण्या हत्यारानं आपल्यावर हल्ला केल्याचंही सपना गिलचं म्हणणं आहे. तसेच, पृथ्वी शॉनं आपल्या छातीला हात लावून आपल्याला दूर लोटल्याचं सपनानं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. दरम्यान, यासंदर्भात आता पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाणार? सपना गिलप्रमाणेच पृथ्वी शॉवरही अटकेची कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian batter prithvi shaw in trouble influencer sapna gill files molestation case pmw