|| मानसी जोशी
भाव वधारल्याने खाद्यपदार्थ विक्रेते आणि उपाहारगृहांचे आर्थिक नुकसान : – अवकाळी पावसामुळे भाज्यांचे भाव कडाडल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच याचा फटका भाजीपाल्याशी संबंधित खाद्यव्यावसायिकांनाही बसू लागला आहे. कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांच्या किंमती वाढल्याने नोकरदार, कामगार आदींची क्षुधातृप्ती करणाऱ्या सॅण्डविच, बटाटा वडा, शेवपुरी, पावभाजी यांच्यासह पोळीभाजी विक्रेत्यांचे नफ्याचे गणित बिघडले आहे.
रोज सकाळी नोकरीनिमित्त मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांची क्षुधा मोठय़ा प्रमाणावर खाद्यपदार्थ विक्रेते आणि छोटी उपाहारगृहे भागवतात. स्वस्त दरात भाज्या आणून त्यांचे पदार्थ बनवून विकण्याकडे या उपाहारगृहांचा कल असतो. मात्र, यंदा आवक घटल्याने भाज्यांच्या दरांत घसघशीत वाढ झाली आहे. याचा फटका या उद्योजकांनाही बसत आहे.
‘गेल्या महिन्याभरापासून भाज्यांचे दर चढेच आहेत. वस्तूंचा खर्च खाद्यपदार्थ विक्रीतून निघत नाही. तसेच अचानक खाद्यपदार्थाच्या दरात वाढही करता येत नसल्याने अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असे ‘हरि ओम सँडविच सेंटर’चे संजय गुप्ता यांनी सांगितले.
मुंबईला गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या परराज्यातून आणि नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि नगर येथून भाज्यांचा पुरवठा करण्यात येतो. ‘राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आणि भाजीचे नुकसान झाले. तयार भाज्या सडल्याने ४० ते ५० टक्के माल फेकून द्यावा लागला आहे. मुंबईसह उपनगरात पाठवलेल्या शेतमालास पुरेसा उठाव मिळत नसल्याने भाजीपाल्याचे दरही वधारले आहेत. पाऊस ओसरेपर्यंत दहा पंधरा दिवस तरी भाजीपाल्याचे दर चढेच राहतील,’ असे वाशीतील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजणे यांनी सांगितले. सध्या वाशी येथील कृषीउत्पन्न बाजार समितीत ६९९ गाडय़ांची आवक होत आहे. त्यात येणारा माल खराब असल्याने त्याची विक्री होत नसल्याचे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालेभाज्यांनाही भाव
सध्या पालक घाऊक बाजारात २० रुपये प्रति जुडी तर किरकोळ बाजारात ६० रुपये प्रति जुडी दराने आहे. तसेच कांद्याची पात घाऊकमध्ये १४ रुपये जुडी आणि किरकोळ बाजारात २० रुपये आहे. मेथी घाऊक बाजारात २५ रुपये प्रति जुडी तर किरकोळ बाजारात ४० रुपये विकली जात आहे.
बटाटाही महाग
किरकोळ बाजारात कांद्याचे दर ८० रुपये किलोवर गेले आहेत. घाऊक बाजारात १८ रुपये प्रति किलोने विकला जाणारा बटाटा आता २१ रुपये प्रति किलोवर गेला आहे. किरकोळ बाजारात २४ रुपये प्रति किलोने होणाऱ्या बटाटय़ाची विक्री आता ३० ते ४० रुपये प्रति किलोने होत आहे.
