प्रसाद लाड किंवा मनोज कोटक यांचा अर्ज मागे घेण्याची चिन्हे; बिनविरोध निवडीसाठीही प्रयत्न
विधान परिषद निवडणुकीत दोन अतिरिक्त अर्ज दाखल केलेल्या भाजपकडून उद्या अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत एकाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ही निवडणूकच बिनविरोध व्हावी म्हणून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असले तरी भाजपकडून कोणता निर्णय घेतला जातो, यावर सारे अवलंबून आहे.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी विधान परिषदेच्या १० जागांकरिता १२ अर्ज दाखल झाल्याने घोडेबाजार जोरात होण्याची शक्यता आहे. संख्याबळानुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. पण भाजपने सहा अधिकृत तर एका अपक्षाला रिंगणात उतरविले आहे. प्रत्यक्ष निवडणूक होणार असल्यास एकाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जाईल. दिल्लीभेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी विधान परिषद निवडणुकीबाबतही चर्चा केली.
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्ष निवडणूक झाल्यास राष्ट्रवादी किंवा भाजपचा एक उमेदवार अडचणीत येऊ शकतो. भाजपने उपसभापतीपदाच्या बदल्यात माघार घेण्याची तयारी दर्शविली आहे. म्हणजेच सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नेत्याची निवड झाल्यावर उपसभापतीपद भाजपला देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने द्यावे, अशी भाजपची मागणी असल्याचे समजते.
उमेदवारीवरून भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि आर. एन. सिंग या बाहेरून आलेल्या तिघांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. दरेकर यांच्यावर मुंबै बँक घोटाळ्याचा आरोप आहे. सिंग यांना आयात करून उमेदवारी दिल्याने पक्षातील उत्तर भारतीय नेते संतप्त झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करायची असल्यास दोघांना तर निवडणूक झाल्यास एकाला माघार घेण्यास भाग पाडले जाईल. प्रसाद लाड किंवा मनोज कोटक यापैकी कोणाचा तरी अर्ज मागे घेतला जाईल, अशी चिन्हे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2016 रोजी प्रकाशित
उमेदवार माघारीवरून भाजपमध्ये खल
प्रसाद लाड किंवा मनोज कोटक यांचा अर्ज मागे घेण्याची चिन्हे; बिनविरोध निवडीसाठीही प्रयत्न
Written by लोकसत्ता टीम

First published on: 03-06-2016 at 02:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internal conflict in bjp