मुंबई : मुळशीतील (जि. पुणे) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींना मदत करणारे ‘उच्चपदस्थ’ म्हणून चौफेर टीका होत असलेले कारागृह प्रशासनाचे क्रमांक दोनचे अधिकारी ‘विशेष पोलीस महानिरीक’ (कारागृह) जालिंदर सुपेकर यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांची पदस्थापना आता गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक करण्यात आली आहे.
वैष्णवीचे पती शशांक हगवणे याचे सुपेकर हे मामा आहेत. हगवणे बंधुंना शस्त्र परवाना मिळवून देणे, मयुरी हगवणेची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवण्यास हस्तक्षेप करणे आदी आरोप सुपेकर यांच्यावर होत आहेत. त्यातच कारागृहातील कैद्यांसाठीच्या खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तुंमध्ये सुपेकर यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत.
या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी सुपेकर यांच्याकडे कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा तीन विभागांचा असलेला अतिरिक्त कारभार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी गृह विभागाने त्यांची गृहरक्षक दलात बदली केली. त्यासंदर्भातला शासन निर्णय गृह विभागातील अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने रात्री काढण्यात आला. सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांची बदली करताना त्यांना त्यांच्या मूळ विभागात राज्य पोलीस दलात पाठवण्यात आलेले नाही. तसेच त्यांची पदावनिती करुन त्यांना उप महासमादेशक पद देण्यात आले आहे. ही बदली करुन गृहविभागाने सुपेकर यांना जोरदार तडाखा दिला आहे.
हगवणे पुत्रांविरुद्ध आणखी एक गुन्हा
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांना खोटी माहिती असलेली कागदपत्रे सादर करून परवाना मिळवल्याप्रकरणी वैष्णवी हगवणेचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणे यांच्या विरोधात वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर हगवणे बंधूंविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. याबाबत कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी फिर्याद दिली आहे.
हगवणे बंधूंनी शस्त्र परवाने मिळवण्यासाठी खोट्या माहितीच्या आधारे त्यांनी शस्त्र परवाना मिळविला होता. पती शशांक, दीर सुशील, तसेच नीलेश चव्हाण यांनी २०२२ मध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळविले होते. तिघांचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोणाचीही हयगय करणार नाही : फडणवीस
आरोपी नीलेश चव्हाण याला नेपाळ येथून अटक करण्यात आली असून, या प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकरणात आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.
‘वकिलांसाठी नीतीसंमत नियमावली करा’
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील खटल्यात आरोपींचे वकील हे पीडितेचे चारित्र्यहनन करत असून भविष्यात अशी प्रकरणे उद्भवू नयेत म्हणून वकिलांसाठी सुस्पष्ट व नीतीसंमत नियमावली करावी, अशी सूचना राज्य महिला आयोगाने ‘महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल’कडे केली आहे. यासंदर्भात आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ‘महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल’ला पत्र लिहिले आहे.
लोकसंख्या वाढली तशी विकृतीही वाढली आहे. परंतु, महिला आयोगात पदांच्या संख्येत वाढ झालेली नाही. – रुपाली चाकणकर, अध्यक्षा राज्य महिला आयोग
आरोपी नीलेश चव्हाण नेपाळ सीमेवर अटकेत
पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी नीलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवर अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना शुक्रवारी यश आले. त्याने पुण्याहून रायगड, दिल्ली, गोरखपूर आणि तेथून नेपाळ गाठल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. चव्हाण पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ‘लूक आउट’ नोटीस जारी केली होती. तरीही तो हाती लागत नसल्याने त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयाकडून ‘स्टॅण्डिंग वॉरंट’ही जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अखेर शुक्रवारी त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २४ मे रोजी कलम वाढ करून नीलेश चव्हाण यालाही सहआरोपी केले. वैष्णवी यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला. तसेच, वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहा महिन्यांचे बाळ चव्हाण याच्याकडे असताना कस्पटे कुटुंबीय त्याच्याकडे बाळ आणण्यासाठी गेले असता, त्यांना चव्हाण याने पिस्तूलचा धाक दाखवून धमकाविले होते.