मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूने झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली असतानाही पालिकेने मात्र यंदा केवळ १२ जणांचाच मृत्यू डेंग्यूने झाल्याचे स्पष्ट केले. अन्य डेंग्यू रुग्णांचा मृत्यू इतर कारणांनी झाल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी सांगण्यात आले. पालिकेकडे नोव्हेंबरमध्ये नोंदवण्यात आलेल्या डेंग्यू मृत्यूंच्या सुमारे नऊ संशयित रुग्णांमधून केवळ पाच रुग्णांचे मृत्यू डेंग्यूने झाल्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. इतर रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले घटक स्पष्ट करण्यास मात्र आरोग्य अधिकाऱ्यांनी नकार दिला.
डेंग्यूची साथ कमी झाल्याचे पालिका अधिकारी गेले दोन आठवडे सांगत असले तरी प्रत्यक्षात ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवडय़ात मृत्यूंची संख्या अधिक झाली आहे. अनेक संशयित मृत्यू डेंग्यूचे नसल्याचे पालिका सांगत असली तरी आरोग्य विभागाच्याच अधिकृत आकडेवारीने गेल्या वर्षीच्या डेंग्यू मृत्यूंची संख्याही ओलांडली आहे. गेल्या वर्षी डेंग्युमुळे अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी नोव्हेंबरमधील पाच मृत्यूंनंतर डेंग्यू बळींची संख्या १२ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये डेंग्यूचा एकही बळी नव्हता. पावसानंतर महिनाभर असलेली डेंग्यूची साथ ओसरली होती. मात्र नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात डेंग्यूची साथ सुरू आहे.
आातापर्यंत डेंग्यूचे केवळ ७६० रुग्ण आढळल्याचे पालिकेकडून सांगितले गेले. मात्र डेंग्यू नोटिफाएबल नसल्याचे कारण पुढे करत महानगरपालिका रुग्णांची खरी आकडेवारी सांगत नाही. राज्य सरकारकडून लेखी आदेश काढला गेला नसल्याने केंद्राने नोटिफाएबल करूनही खासगी दवाखाने व रुग्णालये माहिती पुढे करत नसल्याचे कारण पालिकेकडून दिले जाते. मात्र दरवर्षी नुतनीकरणासाठी पालिकेची परवानगी आवश्यक असल्याने पालिकेच्या सूचनेवरूनही प्रत्येक खासगी रुग्णालय व दवाखाना डेंग्यू रुग्णांबाबत पालिकेला तातडीने माहिती पुरवतात.
यादीत समाविष्ट केलेले मृत्यू
मुलुंड येथील के राधाकृष्णन यांना फोर्टीस रुग्णालयात ८ नोव्हेंबरला दाखल करण्यात आले. त्यांचा १५ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. खारमधील २८ वर्षीय तरुणाचा १६ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. हे दोन मृत्यू डेंग्यूने झाल्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2014 रोजी प्रकाशित
पालिका म्हणते, डेंग्यूचे बाराच बळी
मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूने झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली असतानाही पालिकेने मात्र यंदा केवळ १२ जणांचाच मृत्यू डेंग्यूने झाल्याचे स्पष्ट केले.
First published on: 22-11-2014 at 03:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Just 12 dengue victims says bmc