मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केल्याने शिवसेनाही आक्रमक झाली असून, विधानसभेप्रमाणेच पालिकेतही लढाऊ ‘मराठी बाणा’ दाखविण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. भाजपच्या स्वच्छ भारत अभियानाला राजकीय प्रत्युत्तर म्हणून आता ‘कचरामुक्त मुंबई’ अभियान सुरू केले जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीसाठी आखणी सुरू केली असून, प्रत्येक नगरसेवकावर आणखी एका प्रभागाची जबाबदारी दिली जाणार आहे.
मुंबई महापालिकेवर शिवसेनेची ताकद अवलंबून असून तीच संपविण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याची जाणीव शिवसेनेला झाली आहे. त्यामुळे ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यावर नगरसेवकांची बैठक शुक्रवारी रात्री घेतली. गोपनीय पद्धतीने घेण्यात आलेल्या या बैठकीत ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. राज्य सरकारच्या बहुतांश निर्णयांचे श्रेय पक्ष म्हणून भाजप घेत असून, सत्तेत सहभागी होऊन शिवसेनेला फारसा उपयोग नाही.
भाजपच्या आक्रमकपणाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी ‘कचरामुक्त मुंबई’ मोहीम हाती घेतली जाणार असून प्रत्येक नगरसेवक आणि शाखाप्रमुख यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी महापालिकेच्या यंत्रणेशी समन्वय ठेवून कचरापेटय़ा उपलब्ध करून द्याव्यात आणि परिसराची स्वच्छता राहील याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक नगरसेवकाकडे त्याच्या प्रभागाजवळच्या आणखी एका प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
उद्धव ठाकरे शाखेत फिरणार
शिवसेनेच्या मुंबईत सुमारे ३५० शाखा आहेत. उद्धव ठाकरे हे अधूनमधून तेथे जात असतात, पण आता वर्षभर प्रत्येक शाखेत ठाकरे स्वत: जाऊन तेथील परिस्थिती पाहणार आहेत. तेथील कामकाज कसे होत आहे, नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात आहे की नाही, याची पाहणी ठाकरे करणार आहेत. युती होणार नाही, हे गृहीत धरूनच प्रत्येक प्रभागात शिवसेनेची ताकद वाढेल आणि शिवसेनेशी नागरिक जोडले जातील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही भाजप सत्तेतील आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे. शिवसेनेचा पाडाव करून महापालिका जिंकली, तर पक्ष म्हणून शिवसेनेची प्रचंड हानी होईल. त्यामुळे काहीही करून महापालिकाजिंकून शिवसेनेची ताकद भाजपला दाखवून देण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे.