मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुऱ्याचा बीडीडी चाळींच्या धर्तीवरच पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार सुमारे २७ एकर जागेवरील आठ हजार २३८ रहिवाशांना ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका मोफत दिल्या जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामाठीपुऱ्यात १०० वर्षे जुन्या सुमारे ९४३ उपकरप्राप्त इमारती असून यामध्ये ८२३८ रहिवासी आहेत. या क्षेत्रात एकूण ३४९ बिगर उपकरप्राप्त इमारती, १४ धार्मिक स्थळे आहेत. याव्यतिरिक्त म्हाडाने बांधलेल्या एकूण ११ पुनर्रचित इमारती आहेत. या भागातील अरुंद रस्ते, छोटय़ा धोकादायक इमारतींचा विचार करून बीडीडी चाळींप्रमाणेच आमच्या भागाचा विकास करावा आणि बीडीड़ी चाळीतील रहिवाशांप्रमाणे ५०० चौरस फुटांची घरे देण्याची मागणी या ठिकाणच्या रहिवाशांनी केली होती. त्याची दखल घेत कामाठीपुऱ्याचा एकत्रितरीत्या समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कामाठीपुऱ्याच्या समूह पुनर्विकास आराखडय़ास मान्यता देण्यात आली असून हा प्रकल्प राबविण्यासाठी म्हाडाला नियोजन प्राधिकरण म्हणून सर्वाधिकार देण्यात आले आहेत.

गोलपीठय़ाला नवी ओळख..

या भागाचा समूह पुनर्विकास करताना भूखंडाच्या मालकांना जमिनीच्या मोबदल्यात प्रचलित शीघ्रगणकानुसार(रेडी रेकनर), जमिनीच्या किमतीच्या २५ टक्क्यांनुसार होणारी रक्कम किंवा विक्रीयुक्त बांधकाम क्षेत्रफळामधून १५ टक्के बांधकाम क्षेत्रफळ यापैकी जे जास्त असेल ते देण्यात येणार आहे. दरानुसार त्यामुळे आजवर गोलपीठा अशी काहीशी बदनामीची ओळख असलेल्या कामाठीपुऱ्याला येत्या काही वर्षांत नवी ओळख मिळणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamathipura redevelopment kamathipura residents to get 500 sqft flat zws