मुंबई : यावर्षी पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्यभरातून १,१५० जादा बस सोडण्यात येणार आहेत. पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या ‘चंद्रभागा’ या यात्रा बसस्थानकावरून २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे. या बसस्थानकावर १७ फलाट असून सुमारे एक हजार बस लावण्याची सुसज्ज वाहनतळ व्यवस्था केली आहे. तसेच सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय देखील या बसस्थानकामध्ये केली आहे.

प्रत्यक्ष यात्रेच्या दिवशी एसटी बसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चंद्रभागा बसस्थानकावर १२० पेक्षा जास्त एसटी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. वाहन दुरुस्ती व देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ झालेली वाहने बिघाडल्यास ती दुरुस्त करण्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत. गरोदर, स्तनदा महिलांसाठी बसस्थानकावर हिरकणी कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

गाव ते पंढरपूर थेट सेवा

यात्रा कालावधीत ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास, गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाने बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ५० टक्के व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी भाविक प्रवाशांनी येता-जाता आपल्या गावातून गट आरक्षण करावे, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

मागील वर्षी ६ कोटी रुपये उत्पन्न

मागील वर्षी कार्तिकी यात्रेमध्ये एसटीने तब्बल १,०५५ जादा बसच्या माध्यमातून जवळजवळ ३ लाख ७२ हजार भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली असून त्याद्वारे सुमारे ६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. यावर्षी देखील लाखो भाविक प्रवाशांची सुरक्षित ने – आण करण्यासाठी एसटीचे हजारो कर्मचारी रात्रदिवस सेवेत तत्पर असतील, अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली.