मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) महाराष्ट्र सरकारच्या वतीने उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन गुरुवारी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आदी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठी भाषा खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘जेएनयू’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्रासाठी १० कोटी रुपये वर्ग केले होते. मराठी भाषेला सातासमुद्रापार घेऊन जाता येत असेल, देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी पोहोचवायची असेल तर दिल्लीतील जेएनयूसारख्या विद्यापीठात अध्यासन केंद्र होणे गरजेचे होते, असेही सामंत म्हणाले.

‘जेएनयू’मध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. जेएनयूमध्ये जमीन मिळाली तर तेथे सरकारच्या वतीने शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाईल, असे सांगतानाच विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जमीन देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यांनी जागा दिली तर त्यासाठी लागतील तेवढे पैसे द्यायला सरकार तयार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.