मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेले दागिने व वस्तूंचा लिलाव सुरू झाला असून लिलाव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. लिलावाची सुरुवात चांदीच्या गणपतीच्या मूर्तीपासून झाली असून ५१ हजारात गणपतीच्या मूर्तीचा लिलाव झाला. तसेच, मोदक, मूषक, सोनसाखळी, कलश, मोदकांचे ताट आदींचा आतापर्यंत लिलाव झाला असून यातून आतापर्यंत लाखो रुपये मंडळाकडे जमा झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या चरणी विविध वस्तू व दागिने भाविकांनी अर्पण केले आहेत. या वस्तू व दागिन्यांची लिलाव प्रक्रिया गुरुवारी सायंकाळी सुरू झाली. या लिलावात नागरिक सहभागी झाले आहेत. दरम्यान, लिलावाच्या सुरुवातीला एका भाविकाने गणपतीची चांदीची मूर्ती ५१ हजार रुपयांना घेतली. तर, ३० हजारात मोदकांचा पिरॅमिड व ३१ हजारात मूषक, ४२ हजारात कलश, १ लाख ६६ हजारात सोन्याची चेन, ४१ हजार रुपयांत मोदकाचा लिलाव झाला.
तसेच, गणपतीच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये बॅट, गदा, चांदीचे मोदक, लहान – मोठी समई, चांदीचा उंदीर, सोन्याचा मोदक, रत्नजडित चांदीचा लांब हार आदींचा समावेश असून ही लिलाव प्रक्रिया रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहे. हा लिलाव पाहण्यासाठी आसपासच्या नागरिकांनी गर्दी केली आहे.
मागील वर्षी गणेशोत्सवाच्या दिवसांत भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंचा लिलाव करून मंडळाला किमान ७० लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळाली होती. यंदा या वस्तूंच्या लिलावातून किती रक्कम जमा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.