मुंबई : गेले दोन दिवस सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भांडूपच्या खिंडीपाडा परिसरात दरड कोसळली. मंगळवारी संध्याकाळी या दरडीचा काही भाग कोसळला व त्यासोबत काही घरेही कोसळली. तर बुधवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास आणखी माती खचल्यामुळे काही घरे मातीबरोबर खाली आली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

भांडूप पश्चिमेकडील खिंडीपाडा परिसरात मंगळवारी संध्याकाळी अचानक दरड कोसळली. ओमेगा शाळेच्या समोर असलेल्या साई निकेतन गृहनिर्माण संस्थेत ही घटना घडली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळली. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे आधीच या परिसरातील घरे रिकामी करण्याकरीता मुंबई महापालिका नोटीस बजावत असते. मंगळवारी दरडीचा भाग कोसळला तेव्हा सुमारे चार घरे खचली. तर बुधवारी आणखी दोन रिकामी घरे कोसळल्याली.

मुंबईत निसरड्या डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांमध्ये अनेक कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या झोपड्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. मुंबईत अशी सुमारे २०० ठिकाणे आहेत. यापैकी काही ठिकाणे अतिधोकादायक आहेत. दरड कोसळण्याची शक्यता असलेली सर्वाधिक ठिकाणे पूर्व उपनगरात आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई महापालिकेकडून या झोपड्यांना नोटीसा देण्यात येते. शहर भागात मलबार हिल, ताडदेव अशा ठिकाणी, तर उपनगरात भांडूप, घाटकोपर येथे टेकड्यांवर झोपड्या उभारून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून पालिका दरवर्षी अशा डोंगरावर राहणाऱ्या झोपड्यांना नोटीसा बजावते. मात्र तरीही वर्षानुवर्षे जीव मुठीत घेऊन अनेक नागरिक या झोपड्यांमध्ये राहात आहेत. बहुतांशी झोपड्या या म्हाडाच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर आहेत. मुंबईतील विविध प्रभागांमध्ये निसरड्या डोंगरावर तब्बल २० हजार झोपड्यांमध्ये साधारण लाखभर नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात.

दरड कोसळण्याची २४९ ठिकाणे

भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत संभाव्य दरडी कोसळण्याची २४९ ठिकाणे असून त्यापैकी ७४ ठिकाणे अतिधोकादायक घोषित केली आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणे शहर भागात आणि पूर्व उपनगरात आहेत. पश्चिम उपनगरातील बांदिवली टेकडी, यादव नगर, जोगेश्वरी (पश्चिम), पूर्व उपनगरातील कुर्ला कसाईवाडा, वाशी नाका चेंबूर येथील भारत नगर, घाटकोपर येथील वर्षानगर ही काही अतिधोकादायक ठिकाणे आहेत.

गेल्या ३१ वर्षांत ३१० मृत्यू

१९९२ ते २०२३ यादरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३१० रहिवाशांनी जीव गमावला असून ३०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत, ही बाब माहिती अधिकारात यापूर्वीच उघड झाली आहे.