जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा साने हिची हत्या केल्याचे जीवरक्षक मिथू सिंह याने कबूल केले. हत्येनंतर मृतदेह समुद्रात फेकल्याचेही त्याने पोलीस चौकशीत सांगितले.
पालघर येथील रहिवासी असलेली सदिच्छा ही मुंबईतील जे. जे. ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली, ती परतलीच नाही. तिचा शोध लागत नसल्याने कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
या तरुणीचा शोध घेण्यासाठी बॅण्ड स्टॅण्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिची छायाचित्रे लावण्यात आली होती. जे. जे. मार्ग पोलिसांनीही तिचा शोध सुरू केला होता. मात्र ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.
तांत्रिक पुराव्यांवरून तिचे अखेरचे ठिकाण वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखा कक्ष ९ ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या वेळी तिला जीवरक्षक मिथू सिंह याने अखेर पाहिले होते.
३०२ अंतर्गत गुन्हा दाखल
वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मिथू आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. चौकशीत सदिच्छा हिची हत्या केल्याचे मिथू याने कबूल केले. तसेच तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याचेही सांगितले. पोलिसांनी अगोदर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पण आता या प्रकरणी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचे कलम वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.