मुंबई : प्राचीन परंपरा आणि रसरशीत वर्तमान असलेल्या मराठी काव्य, नाट्य, साहित्य, लोककला, शिल्प-चित्रकलेसारख्या विविध कलांमधील अभिजाततेचे दर्शन घडवणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे पडघम वाजू लागले आहेत. मराठी संस्कृतीच्या बहुआयामी सौंदर्याची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमाची मुहूर्तमेढ ख्यातनाम नाटककार आणि विचारवंत महेश एलकुंचवार यांच्या हस्ते रोवली जाणार आहे.

कलेची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या मराठी संस्कृतीच्या सौंदर्योत्सवाचे बिलोरी दर्शन ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या माध्यमातून घडेल. दीपोत्सवानंतर सुरू होणारा हा कला उत्सव मराठीच्या सांस्कृतिक संचितात भर घालणारा ठरेल. या अनुपम संस्कृती उत्सवाचे उद्घाटन गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी निमंत्रितांच्या उपस्थितीत होणाऱ्या एका खास सोहळ्यात ख्यातनाम नाटककार, पटकथाकार आणि मराठीच्या परिघाबाहेरही बहुपरिचित असलेले विचारवंत महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होत आहे. प्रसिद्ध लेखक आणि एलकुंचवारांच्या साहित्याचे अभ्यासक हिमांशू स्मार्त हे या कार्यक्रमात एलकुंचवार यांच्याशी संवाद साधतील.

एलकुंचवार लिखित ‘आत्मकथा’, ‘एका नटाचा मृत्यू’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘युगांत’, ‘मग्न तळ्याकाठी’ यांसारखी अनेक अभिजात, विचारप्रवर्तक नाटके; ‘मौनराग’, ‘त्रिबंध’ यांसारखे ललितनिबंध संग्रह मराठी सारस्वताच्या पटावर मानबिंदू ठरले. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषेतही त्यांची नाटके गाजली. वास्तववादी, प्रतीकात्मक शैलीतील लेखनासाठी प्रसिद्ध असलेले, साहित्यिक-नाटककार-प्राध्यापक अशी बहुआयामी प्रतिभा लाभलेले एलकुंचवार यांच्या हस्ते ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे उद्घाटन होणे हा नक्कीच अपूर्व आणि आनंददायी योगच.

मराठी साहित्याशी, लोककलेशी, संगीताशी, नाटकाशी जोडून घेत स्वत:ला समृद्ध करण्याची नव्या- जुन्या पिढीची धडपड सध्या प्रकर्षाने जाणवते आहे. नाटकांना होणारी गर्दी, मराठी साहित्यावर आधारित नवनवीन कथा- कादंबऱ्यांचे अभिवाचन ते पॉडकास्टसारख्या नव्या तरुण माध्यमातून साहित्यिक, कलावंत यांच्या अंतरंगात शिरून त्यांच्या कलासक्त जगण्याचा वेध घेण्याचा प्रयत्न, चित्रकला-शिल्पकलेला केवळ छंदाचे रूप न देता त्यातच जगण्याचा अर्थ शोधू पाहणारे नवनवे कलावंत या सगळ्यातून अभिजात मराठी संस्कृतीची सौंदर्यभाषा जपण्याची आस वाढीला लागलेली दिसते. हे लक्षात घेत कालप्रवाहानुसार झालेले सगळे बदल कवेत घेत विस्तारलेल्या मराठी कलासंस्कृतीचे सौंदर्य मुंबईत विविध ठिकाणी होणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिट फेस्ट’च्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडणार आहे.