सतार, संतूर, बासरी, तबला आणि पखवाज अशी पाच वाद्ये. प्रत्येकाचा स्वरभाव निराळा आणि त्यामुळे प्रत्येक वाद्याची अनुभूती निराळी. आपापली खुबी जपताना एकमेकाला दाद देत कलाकारांनी केलेले सादरीकरण रसिकांची वाहवा मिळवून गेले.

‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चा सातव्या दिवशी सांगीतिक कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना घेता आला. बासरीवादक ऋषीकेश मजुमदार, सतारवादक स्वीकार कट्टी, संतूरवादक सत्येंद्रसिंह सोलंकी, तबलावादक रोहित देव आणि पखवाजवादक गणेश सावंत यांनी आपल्या सांगीतिक प्रतिभेने ‘बागेश्री रागाचे’ अंतरंग वाद्यांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केले.

दोन तास चाललेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली आणि जाणकार श्रोत्यांची दाद कलाकारांना मिळत गेली. ऋषीकेश मजुमदार, स्वीकार कट्टी आणि सत्येंद्रसिंह सोलंकी यांनी पहिल्यांदाच ‘लिटफेस्ट’च्या मंचावर एकत्र सादरीकरण केले.