Lucky Restaurant in Bandra SRK and Salman’s favourite biryani : साडेतीन दशकांपूर्वी मुंबईतील एका रात्री अभिनेता शाहरुख खान वांद्र्यातील लकी रेस्तराँमध्ये बिर्याणी खात होता. त्याच वेळी शेजारच्या टेबलवर बसलेल्या एका चित्रपट निर्मात्याने त्याला विचारलं, “तुला अभिनय करायला आवडेल का? शाहरुखनेही त्या निर्मात्याला होकार दिला. तिथून शाहरुखची अभिनय कारकिर्दी सुरू झाली अन् आज तो कुठे आहे हे आपण पाहतोच आहोत. त्याही आधी काही दशकांपूर्वी सलीम खान (पटकथालेखक) नावाचा तरुण नुकताच मुंबईत आला होता. तो दररोज सकाळी या रेस्तराँमध्ये एक कप चहा प्यायला यायचा. या रेस्तराँमध्ये बसून त्याने अनेक कथा लिहिल्या ज्या पुढे बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर अवतरल्या. अनेक बॉलीवूड कलाकारांच्या आयुष्याचा, कारकिर्दीचा वाढता आलेख या रेस्तराँने पाहिला आहे.
स्वतःची बँड्रा बॉय (वांद्र्याचा मुलगा) म्हणून ओळख सांगणारे सय्यद सफर अली हुसैनी (८४) हे या रेस्तराँचे मालक आहेत. या लकी रेस्तराँमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेचे ते साक्षीदार आहेत. त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केल्यानंतर ते रेस्तराँमधील अनेक घटनांच्या आठवणी ताज्या करतात.
रेस्तराँची सुरुवात कशी झाली?
हुसैनी म्हणाले, “माझ्या वडिलांनी म्हणजेच सय्यद अली अकबर यांनी ९ सप्टेंबर १९३८ रोजी हे रेस्तराँ सुरू केलं होतं. सय्यद अली अकबर हे १२ वर्षांचे असताना इराणहून मुंबईला आले होते. सुरुवातीला ते मदनपुरा भागात चहा विकायचे. नंतर ते पुण्याला गेले. तिथे काही उद्योगधंदे केल्यानंतर एका महिला साध्वीने त्यांना मुंबईला परत जाण्यास सांगितलं. तिथेच त्यांची भरभराट होईल असंही सांगितलं. त्या सल्ल्यावर विश्वास ठेवत ते मुंबईला आले. काही पैशांची जमवाजमव करून वांद्र्यातील बाजार रोडवर मासळी बाजारासमोर त्यांनी एक छोटं रेस्तराँ सुरू केलं. त्यानंतर त्यांनी वांद्र्यातील एका कार शोरूमसमोरील जागा भाड्याने घेतली. तीन महिन्यांचं ३७५ रुपये भाडं देऊन त्यांनी नव्या जागी रेस्तराँ सुरू केलं. आज याच ठिकाणी लकी रेस्त्रराँ आहे.
रेस्तराँला लकी हे नाव का दिलं?
“ज्या दिवशी त्यांनी ही जागा पाहिली त्याच दिवशी त्यांना सहज ही जागा मिळाली. ही नशिबाची गोष्ट होती असं माणून त्यांनी या रेस्तराँला ‘लकी’ असं नाव दिलं. उधारीवर घेतलेल्या ३,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर हे रेस्तराँ सुरू झालं. सुरुवातीला या रेस्तराँमध्ये केवळ सात पदार्थ विकले जायचे. मटण बिर्याणी, कीमा पाव, रोस्ट चाप, मटण चॉप, कोरमा, डाळ आणि तरकारी एवढेच पदार्थ रेस्तराँमध्ये उपलब्ध होते.”
सय्यद अली अकबर यांनी पुढे मेनू वाढवला. आधी चायनीज, मग मुघलाई, नंतर तंदुरी पदार्थ वाढवण्यात आले. ते म्हणाले, “ज्या ठिकाणी आमचं रेस्तराँ आहे त्या चौकाला मोहम्मद रफी चौक असं नाव दिलं आहे. परंतु, रेस्तराँमुळे आता हा चौक लकी जंक्शन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.”
हॉटेल व्यवसायात तिसरी पिढी
सय्यद अली अकबर यांची तिसरी पिढी हे रेस्तराँ चालवत आहे. अकबर यांचे नातू व सय्यद सफर अली हुसैनी यांचे पुत्र एस. मोहसीन (५७) हे कुटुंबाची परंपरा चालवत आहेत. मोहसीन म्हणाले, “गरीब असो अथवा श्रीमंत, सर्वजण आमच्या रेस्तराँमध्ये येतात. त्यांच्या आवडीचा पदार्थ खातात. आमचे कर्मचारी व ग्राहक वेगवेगळ्या समाजातून येतात.”
लकी रेस्तराँमध्ये २४० जण बसून जेवू शकतात. यात खासगी रुम्स, वातानुकूलित विभाग, मोकळी बाग उपलब्ध आहे. लकीच्या मालकांनी २००७ मध्ये गोरेगावमध्ये एक हॉटेल व एक रेस्तराँ सुरू केलं आहे.
सलमान व अरबाजचे आवडते पदार्थ
मोहसीन म्हणाले, “मटण बिर्याणी ही येथे येणाऱ्या ग्राहकांची पहिली पसंती आहे. तीच आमची खरी ओळख आहे. सलमान खानलाही आमची बिर्याणी आवडते. तर अरबाज खान म्हणतो तुम्ही लकीची बिर्याणी खाल्ली नसेल तर तुम्ही बिर्याणी प्रेमी नाही. हल्ली कलाकार स्वतः येत नाहीत. ते त्यांच्या कर्मचाऱ्यांकरवी, प्रोडक्शन हाऊसकरवी ऑर्डर पाठवतात. अलीकडे संजय दत्त येथे आला होता. परंतु, त्याला पाहून इतकी गर्दी झाली की आम्हाला त्याला मागच्या दाराने बाहेर काढावं लागलं. मन्नतपासून गॅलेक्सीपर्यंत सगळीकडे आमच्या ऑर्डर्स जातात.”
लकीच्या यशाचं गमक काय?
‘लकी’च्या यशाबद्दल बोलताना मोहसीन म्हणाले, “मला माझ्या वडिलांनी तीन गोष्टी शिकवल्या आहेत. प्रामाणिक राहा, कष्ट कर आणि नम्रपणे वाग, मी ते आत्मसात केलं आहे आणि ईश्वर साथ देतोय. ईश्वर सगळ्यांना संधी देत असतो आपल्याला संधी मिळाल्यावर ती पकडता आली पाहिजे.”