मुंबई : महादेव बुक बेटिंग अॅपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईतील चित्रपट निर्मिती संस्थेशी संबंधित ठिकाणावर शुक्रवारी छापा टाकला. याशिवाय देशभरात पाच ठिकाणीही छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या चित्रपट निर्मिती संस्थेला महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक मदत मिळाल्याचा ईडीला संशय आहे. याबाबत अंधेरीतील निर्मिती संस्थेच्या ठिकाणावर शोधमोहीम राबवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई शनिवारीही सुरू होती.
याप्रकरणी निर्मात्याची ईडीने चौकशी केली. निर्मात्याने गेल्या वर्षी शिवाजी महाराजांशी संबंधित चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली होती. याशिवाय मुंबई, छत्तीसगड, दिल्ली या ठिकाणीही ईडीने शोधमोहीम राबवली. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ५० हून अधिक बेटिंग अॅप्लिकेशन सुरू असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यासाठी अनेक कलाकारांसह परदेशी खेळाडूंनीही जाहिराती केल्या आहेत.