मुंबई : फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यूनंतर चौकशी योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांनी सोमवार, ३ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या सर्व संघटना कामावर बहिष्कार टाकणार असल्याने राज्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी रविवारी संयुक्तरीत्या मेणबत्ती मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. त्यानंतर निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’, आंतरवासिता करणाऱ्या डॉक्टरांची संघटना ‘अस्मि’ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संघटना ‘एमएसआरडीए’ या सर्व वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामधील बाह्यरुग्ण सेवेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहेत.
त्याचप्रमाणे मॅग्मो, आयएमए, एएमओ या डॉक्टरांच्या संघटना सर्व प्रशासकीय बैठका आणि दृकश्राव्य माध्यमातून होणाऱ्या बैठकांवर बहिष्कार घालणार आहेत. मॅग्मो व आयएमए या डॉक्टरांच्या संघटना ७ नोव्हेंबर रोजी बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेवर बहिष्कार टाकणार आहेत. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास १४ नोव्हेंबरपासून सर्व आपत्कालीन सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे वैद्यकीय अधिकारीही सहभागी होणार आहेत.
सर्व संघटनांची प्रथमच एकजूट
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘मार्ड’, ‘मॅग्मो’, ‘आयएमए’, ‘एमएसआरडीए’, ‘एएमओ’, ‘एमएसएमटीए’ आणि ‘अस्मि’ या सर्व डॉक्टरांच्या संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय सर्व वैद्यकीय संघटना माघार घेणार नाहीत, असे डॉक्टरांच्या संघटनांकडून सांगण्यात आले.
रुग्णसेवा बाधित होऊ नये म्हणून प्रयत्न
डॉक्टरांचे आंदोलन लक्षात घेता रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी बाह्यरुग्ण विभाग व अत्यावश्यक विभागांमध्ये प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शस्त्रक्रिया बाधित होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव व कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांसह उपनगरीय रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग आणि आपत्कालीन विभाग सुरळीत सुरू ठेवण्यासंदर्भातील आदेश अधिष्ठातांना दिले आहेत.
बाह्यरुग्ण विभाग प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्याबरोबरच वरिष्ठ प्राध्यापक सर्व रुग्णकक्षांचा आढावा घेऊन शक्य असल्यास स्थिर असलेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येईल. तसेच आंदोलन कायम ठेवण्यात आल्यास ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सर्व अधिष्ठातांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व सर्व रुग्णालयांच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.
