मुंबई : मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा (हिंदी) इयत्ता पहिलीपासून इतर माध्यमांच्या शाळांप्रमाणे न शिकविल्यास महाराष्ट्रातच मराठी मुले मागे पडतील. तसेच तिसरी भाषा मुलांना अतिशय सोप्या स्तरावर शिकविल्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक कौशल्य आत्मसात करता येईल आणि त्याचा त्यांच्या बौद्धिक विकासावर सकारात्मक परिणाम होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
भविष्यामध्ये संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येणाऱ्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या मूल्यमापनाच्या संकल्पनेमध्ये निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एखाद्या विद्यार्थ्याने किती विषय किंवा कला शिकलेल्या आहेत, त्यासाठी त्याने किती वेळ दिलेला आहे. यावरून त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षणासाठीचे पॉइंट्स मिळण्याची व्यवस्था होणार आहे. त्यामुळे मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी तिसरी भाषा न शिकल्याने इयत्ता पहिली ते पाचवीसाठी एका विषयाचे संपूर्ण क्रेडिट पॉइंट्स त्यांना मिळणार नाहीत. परिणामी ’अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ या संकल्पनेमुळे महाराष्ट्रातच मराठी मुले अन्य माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतील, अशी माहिती शिक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
इतर माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून अतिशय सोप्या स्तरावर मराठी भाषा शिकवण्यात येते, त्याच समान स्तरावर मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना तिसरी भाषा इयत्ता पहिलीपासून शिकविल्यामुळे त्यांना आणखी एक कौशल्य आत्मसात करता येईल. त्याचा त्यांच्या बौद्धिक विकासावर सकारात्मक परिणाम होईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अगदी लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या सभोवतालच्या वातावरणात असल्यामुळे, महाराष्ट्रातील मुलांना या भाषेचा ताण शैक्षणिकदृष्ट्या मुळीच असणार नाही याची खात्रीही करण्यात येईल. तसेच जे पालक हिंदी व्यतिरिक्त इतर भाषा निवडतील त्यांचेही या बाबतीमध्ये शिक्षकांमार्फत समुपदेशन करून विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सभोवताली असणारी योग्य ती भाषा निवडण्याची आणि ती शिकवण्याची योग्य व्यवस्था शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडून करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात दरवर्षी २ लाख मुले शिकतात तिसरी भाषा
महाराष्ट्रामध्ये मराठी व इंग्रजी व्यतिरिक्त इतर माध्यमांच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये मराठी ही भाषा काही वर्षांपासून माध्यम भाषा व इंग्रजी भाषेसह शिकवण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत दहा टक्के म्हणजेच इयत्ता पहिलीसाठी अंदाजे २० लाख विद्यार्थ्यांपैकी २ लाख विद्यार्थी इतके आहे. या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणारी मराठी भाषा ही केवळ श्रवण-संभाषण स्वरूपामध्येच सुरुवातीला शिकवण्यात येते आणि त्याविषयीचे लेखन वाचन कौशल्य फार कमी वेगाने पुढील वर्गामध्ये शिकवले जाते. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त ताण येऊ नये हाच यामागील उद्देश आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक स्वतःहून आपल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरच विविध विदेशी भाषा सुद्धा शिकवतात.