मुंबई : समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शिक्षकदिनी राज्य सरकारकडून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. या संदर्भातील शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विजेत्या शिक्षकांची यादी १ सप्टेंबर रोजी जाहीर होऊन त्यांना ५ सप्टेंबर रोजी गौरविणे अपेक्षित होते. मात्र शिक्षक दिन झाला तरी शिक्षण संचालनालयातर्फे शिक्षकांची नावेच जाहीर करण्यात आली नाहीत. त्यामुळे देशभरामध्ये शिक्षकांचा गौरव होत असताना यंदा सरकारला शिक्षकांचा गौरव करण्याचा विसर पडला असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षकांकडून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक १७ जुलै रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांकडून १८ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. अर्ज केलेल्या शिक्षकांच्या १६ ते १८ ऑगस्टदरम्यान मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीमधून निवड झालेल्या शिक्षकांची यादी १ सप्टेंबर राेजी शासननिर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार होती. मात्र शिक्षण संचालनालयाकडून १ सप्टेंबर किंवा त्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची यादीच जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी होणारा पुरस्कार सोहळाही झाला नाही. त्यामुळे यंदा दिल्लीसह देशातील विविध राज्यांमध्ये शिक्षकांचा गौरव होत असताना महाराष्ट्रातील शिक्षक हे शिक्षकदिनी पुरस्काराविनाच असल्याची खंत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षकांसाठी महत्त्वाचा असलेल्या या पुरस्काराची घोषणा करण्यात सरकारकडून होत असलेला विलंब म्हणजे शासकीय ढिसाळपणा आहे. शिक्षक दिनाव्यतिरिक्त अन्य दिवशी हा पुरस्कार मिळणे म्हणजे शिक्षकांकडून त्यांचा आनंद हिरावून घेण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया काही शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आली. शिक्षकांसाठी हा एक सन्मानाचा पुरस्कार आहे. पुरस्कारासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही हा पुरस्कार जाहीर होण्यास का विलंब करण्यात येत आहे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर करणे रखडणे हे यंदाच घडलेले नाही. या पूर्वी २०२२मध्येही पुरस्कारांची घोषणा रखडली होती. त्यामुळे शिक्षण विभागाच्या पुरस्कार प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून या संदर्भातील प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. निवड झालेल्या शिक्षकांची यादी मंगळवारी जाहीर होऊन सप्टेंबरमध्येच शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यंदा प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्याने पुरस्काराला विलंब झाला आहे. – डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक
राज्यातील शिक्षकांसाठी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे महत्त्व मोठे आहे. मात्र हे पुरस्कार योग्य वेळेत जाहीर होणे, म्हणजे शिक्षकदिनी पुरस्कार वितरण समारंभ आयोजित होणे आवश्यक आहे. तरच त्या पुरस्कारांचे महत्त्व टिकून राहणार आहे. अन्यथा पुरस्कारांचे कार्यक्रम अनेक होतात. केंद्रीय शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करते, तर राज्याच्या शिक्षण विभागाला ते का जमत नाही? – महेंद्र गणपुले, माजी मुख्याध्यापक