मुंबई : अतिरिक्त रक्त संकलनामुळे रक्त मुदतबाह्य होऊन वाया जाते. तसेच रक्त हस्तांतरणामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मेगा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येऊ नये. तसेच एका रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त ५०० युनिट पेक्षा जास्त रक्त संकलित होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये आबिटकर यांनी दिलेल्या निदर्शनाचे पालन करत परिषदेने राज्यातील सर्व रक्त पेढ्यांना रक्त संकलनाबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार रक्तदान शिबिरे घेण्यासाठी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी यांची ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे यापुढे परवानगी घेणे आवश्यक राहील.
ही परवानगी संबंधित जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी यांनी जास्तीत जास्त तीन दिवसात देणे अपेक्षित आहे. अन्यथा अशी परवानगी तीन दिवसात प्राप्त न झाल्यास मानवी परवानगी गृहीत धरण्यात यावी. मात्र ही परवानगी घेताना मेगा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार नसल्याची खातरजमा करावी, तसेच रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त ५०० युनिट पेक्षा जास्त रक्त संकलित होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश रक्तपेढ्यांना देण्यात आले आहेत.
रक्तदात्यांना आमिषे दाखवणाऱ्यांवर होणार कारवाई
स्वैच्छिक रक्तदान शिबिरामध्ये काही ठिकाणी रक्तदात्यांना आमिषे दाखवून महागड्या वस्तू भेट म्हणून देण्यात येतात. अशा तक्रारी राज्य रक्त संक्रमण परिषदेच कार्यालयास प्राप्त होत असतात. हा प्रकार अनुचित असून औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४५ नियम क्रमांक ११२ इए (जी) चे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे असा प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
रक्तांची मुदत ३५ दिवसांची
रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन केले जाते. रक्त पेढ्यांनी संकलित केलेल्या रक्तावर प्रक्रिया करून त्याची साठवणूक केली जाते. संकलित रक्त आणि त्यावर प्रक्रिया करून विलग केलेल्या लाल पेशी यांची जीवनमर्यादा ३५ दिवसांची असते. त्यानंतर हे रक्त व लाल पेशी वापरण्यासाठी अयोग्य ठरतात त्यामुळे त्यांचा वापर वेळेत होणे आवश्यक आहे.
दररोज ५००० युनिट रक्ताची गरज
राज्याला दररोज ४ ते ५ हजार युनिट रक्ताची गरज आहे यापैकी एकट्या मुंबईत ५०० ते १००० युनिट रक्त वापरले जाते खाजगी रक्त पेढ्यांना इतर राज्यातील रक्तदात्यांना अतिरिक्त रक्त विकण्याची परवानगी आहे परंतु सरकारी रक्त पेढा ते रक्त विकू शकत नाहीत.