मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या विविध २५ कंपन्यांच्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता तपासण्यात आली. तपासणीअंती बहुतांश फटाक्यांची आवाज मर्यादा ९७.१ डेसिबल इतकी होती. फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा जास्तीत जास्त १२५ डेसिबल इतकी आहे. यानुसार यंदा फटाक्यांचा आवाज मर्यादीतच आहे.
दरवर्षी दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता नियंत्रणात ठेवण्यासाठी विक्रीस ठेवलेल्या पर्यावरणपूरक फटाक्यांच्या आवाजाची चाचणी केली जाते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने चेंबूर येथील ‘आरसीएफ’ मैदानात गुरुवारी तब्बल २५ कंपनाच्या फटाक्यांची चाचणी केली. तसेच या फटाक्यांमधील रसायनांचीदेखील तपासणी करण्यात आली. या तपासणीनुसार फटाक्यांत ॲल्युमिनियम, सल्फर, पोटॅशियम नायट्रेट यांचा प्रामुख्याने समावेश होता. दरम्यान, देशात २०१८ मध्येच बेरियम, तसेच बेरियम क्षारांवर बंदी घालण्यात आली होती. तरीही फटाक्यांमध्ये त्याचा सर्रास वापर केला जातो. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा याचे प्रमाण फारच कमी आहे. गेल्यावर्षी केलेल्या चाचणीत बेरियम, सल्फर, तसेच कॉपर रसायनांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले होते. दरम्यान, चाचणीत सर्व फटाक्यांचा आवाज मर्यादेत असल्याचे समोर आले असून प्रत्येक फटाक्यांचा आवाज ६० ते ९० डेसिबलदरम्यान आहे. एका फटाक्यासाठी १२५ डेसिबल इतकी आवाज मर्यादा आहे. दरम्यान, निवासी परिसरात ५५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. रात्री १० ते साकळी ६ या वेळेत हीच मर्यादा अनुक्रमे ५० व ४० डेसिबल इतकी आहे.
आवाजाची पातळी आणि क्यू आर कोड नाही
नियमानुसार फटाक्यांवर आवाजाची पातळी आणि क्यू आर कोड नमुद असणे आवश्यक आहे. मात्र, यंदा फटाक्यांची चाचणी करताना अनेक फटाक्यांवर आवाजाची पातळी आणि क्यू आर कोड नमुद नसल्याचे उघडकीस आले आहे. आवाजाची पातळी किंवा क्यू आर कोड नमुद नसलेल्या फटाक्यांची बाजारात विक्री करण्यास नियमानुसार बंदी आहे. दरम्यान, या सर्व निरीक्षणाची नोंद डायरेक्ट ऑफ एक्सप्लोजिव्ह यांना पत्राद्वारे कळवण्यात येणार असल्याचे प्रदूषण मंडळाने सांगितले. यंदा दिवाळीत राज्यातील एकूण १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची पातळी मोजली जाणार आहे.
