मुंबई: दरवर्षी १५ सप्टेंबरला राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त सरकारी सेवेतील अभियंत्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना पुरस्काराने गौरविण्यात येते. राज्यभरातील ३९ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा मात्र या पुरस्कारांबाबत बांधकाम विभाग उदासीन असून अद्यापही यासाठी पुरस्कारार्थींची निवड करण्यात आलेली नाही.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागातील अभियंत्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार दिला जातो. शासन निर्णय काढून पुरस्कारांची घोषणा केली जाते. मात्र यंदा अद्याप या पुरस्कारांसाठी आलेल्या शिफारशींची छाननी मंत्रालय स्तरावर सुरू आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात पुरस्कारांची घोषणा शासन निर्णय काढून केली जाईल.

त्यानंतर मंत्री महोदयांची वेळ घेऊन पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. सन २०२४ पर्यंतचे उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर होऊन त्याचे वितरण झाले आहे. बांधकाम खात्यातील अधीक्षक अभियंता आणि त्या खालील पदावर कार्यरत अभियंते, अतांत्रिक पदावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. दरवर्षी जास्तीत जास्त ३९ जणांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.