मुंबई : महावितरण कंपनीने देशातील बड्या उद्योगसमूहाच्या कंपनीकडून एक हजार मेगावॉट औष्णिक वीजखरेदी करण्याचा केलेला प्रयत्न फसला आहे. महानिर्मिती कंपनीचे संच जुने व कालबाह्य झाल्याचे कारण देत ही वीज खरेदी करण्याचा घाट महावितरण कंपनीने घातला होता. पण वीजखरेदीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी महानिर्मिती कंपनीला याचिकेत प्रतिवादी करावे, असे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने दिल्याने महावितरण कंपनीची पंचाईत झाली आणि कंपनीने वीजखरेदीचा प्रस्तावच गुंडाळला.

या वीजखरेदी प्रस्तावामागे काय गौडबंगाल आहे आणि कोणत्या बड्या कंपनीला नजरेसमोर ठेवून ही धडपड करण्यात आली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने महानिर्मिती, महावितरण व अन्य खासगी वीज कंपन्यांच्या माध्यमातून सौर, वारा, उदंचन जलविद्याुत निर्मिती (पम्प्ड स्टोरेज) आदी अपारंपरिक स्राोतांमधून हरित वीजनिर्मिती उपलब्ध करण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. पुढील दोन-तीन वर्षात सुमारे १६ हजार मेगावॉटहून अधिक सौर ऊर्जा तीन ते साडेतीन रुपये प्रति युनिट दराने उपलब्ध होणार आहे. तरीही महावितरण कंपनीने एक हजार मेगावॉट औष्णिक वीज खरेदीसाठी निविदा मागविण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका राज्य वीज नियामक आयोगापुढे २१ जानेवारी २०२५ रोजी सादर केली. या याचिकेवर ११ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. महानिर्मिती कंपनीचे २० टक्के संच जुने व कालबाह्य झाले असून त्यातून सुमारे ९ ते ९.५० रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी करावी लागत आहे. पॉवर एक्सेंजमध्ये प्रति युनिट ५.५० ते ६.५० रुपये प्रतियुनिट दराने वीज उपलब्ध असूनही ही महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे एक हजार मेगावॉट औष्णिक वीज एक एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० या कालावधीसाठी खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची परवानगी महावितरणने आयोगाकडे मागितली होती.

महानिर्मिती वीजकंपनीचे संच जुने व कालबाह्य झाले असतील आणि ते बंद पडले, तर महावितरण कंपनीला कोणताही स्थायी आकार (फिक्स्ड चार्जेस) द्यावे लागणार नाहीत. यासंदर्भात वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी महानिर्मिती कंपनीला याचिकेत प्रतिवादी करावे, असे आदेश आयोगाने दिले. त्यामुळे महावितरण कंपनीने आयोगापुढील याचिका मागे घेतली.

वीजखरेदीमागे गौडबंगाल काय ?

महानिर्मिती कंपनीला छत्तीसगढमधील गारेपालमा ही कोळशाची खाण मंजूर झाली आहे. या खाणीतून कोळसा काढणे व व्यवस्थापनाचे कंत्राट कंपनीला देण्यात आले आहे. खाणीतून उपलब्ध होणाऱ्या ‘ रिजेक्ट कोल ‘(तुकडा कोळसा) चा वापर कमी वीजनिर्मिती क्षमता असलेल्या संचामध्ये करता येतो. सुपरक्रिटीकल वीजनिर्मिती संचामध्ये हा रिजेक्ट कोल वापरता येत नाही. या रिजेक्ट कोलचा वापर करुन एक हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे एका बड्या वीजकंपनीने ठरविले आहे. ही वीज विकत घेण्याचा महावितरण कंपनीचा प्रयत्न होता, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

महानिर्मितीचा विस्तार कार्यक्रम

महानिर्मिती वीज कंपनीने जुने व कालबाह्य संच बंद करून नवीन सुपरक्रिटीकल तंत्रज्ञानाचे संच बसविण्यासाठी पुढील दोन-चार वर्षांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. महानिर्मितीच्या वीज उपलब्धतेत वाढ होणार आहे. हरित ऊर्जेवर भर असताना महावितरण कंपनीने खासगी वीजकंपनीकडून औष्णिक वीजखरेदीचा प्रस्ताव दिला होता. त्यातून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.