मुंबई : मंत्रालय परिसरात शुक्रवारी दुपारी मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू झाल्यामुळे या परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. मुख्य जलवाहिनीलाच गळती लागल्यामुळे वेगाने पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे रस्त्याचा काही भागही खचला. मुंबई महापालिकेने परिसराचा पाणीपुरवठा बंद केला असून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यास किमान चोवीस तास लागणार आहे.

चर्चगेट परिसरात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता रस्त्यावर पाणी साचले होते. थेट मंत्रालयाच्या समोरच्याच रस्त्यावर जमिनीखालून पाण्याचे झरे फुटल्यागत पाणी वर येत होते. त्यामुळे काही मिनिटांतच रस्त्यावर पाणी तुंबले. या परिसरातील ६०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर गळती सुरू झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती.

या गळतीमुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. चर्चगेट, कुलाबा परिसराचा समावेश असलेल्या ए विभाग कार्यालयाच्या हद्दीतील जलकामे विभागाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास किमान चोवीस तास लागणार आहेत. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली होती.

या दुरूस्ती कामामुळे कफ परेड, जी. डी. सोमाणी मार्ग , कुलाबा कोळीवाडा आणि गीता नगर या सर्व परिसरांमध्ये पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवण्यात आला. दुरूस्ती काम झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे जल अभियंता विभागाने कळवले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

वाहतूक वळवली

जलवाहिनी फुटल्यामुळे दक्षिण दिशेकडे जाणारी वाहतूक संथगतीन सुरू होती. तर उत्तर दिशेने जाणारी वाहतूक वाल्मिकी चौक, जमनालाल बजाज मार्गे व विनय के शहा मार्गे वळवण्यात आली. तसेच बसमार्गही वळवण्यात आले आहेत. बसमार्ग क्रमांक १२१, १३८ या बसगाड्या अप दिशेने राजगुरू चौक येथून जगन्नाथ भोसले मार्गाने एन सी पी ए वळवण्यात आल्या. तेथून उजवे वळण घेऊन नेताजी सुभाष चंद्र बोस मार्गाने पूर्ववत जात होत्या. तसेच बसमार्ग क्रमांक ५,८, १५, ८२, ८७, ८९, १२६ या बसगाड्या अप दिशेने जगन्नाथ भोसले मार्गावरून जमनादास बजाज मार्गाने मंत्रालय येथे जात होत्या. हा बदल दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.