मुंबई : भारतातील प्रतिष्ठेच्या चित्रपटमहोत्सवांपैकी एक असणारा ‘मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ अर्थात ‘मामी मुंबई फिल्म फेस्टिवल’ यंदा २०२५ साली होणार नाही, अशी अधिकृत माहिती ‘मामी’ मुंबई चित्रपट महोत्सवाचे संचालक शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांनी दिली. त्यामुळे मनोरंजनसृष्टीत नाराजी पसरली असून या निर्णयाविरोधात विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी म्हणून नेहमीच झगमगाटात राहणारी ‘मुंबई’ स्वतःचा प्रतिष्ठेचा महोत्सव सुरू ठेऊ शकत नाही, हा अत्यंत ‘क्रूर विरोधाभास’ असल्याचे म्हणत प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘मामी’ मुंबई चित्रपट महोत्सव समितीने समाजमाध्यमांवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मामी’ मुंबई चित्रपट महोत्सव २०२५ साली होणार नाही. एका सर्जनशील दृष्टिकोनासह आणि नवीन चमूसह महोत्सवाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जेणेकरून हा महोत्सव भारतासह जगभरातील स्वतंत्र आणि प्रादेशिक चित्रपटांचा दर्जेदार मंच म्हणून पुन्हा उभा राहील. या महोत्सवाचे सुधारित वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे आणि पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२६ च्या आवृत्तीच्या नवीन तारखा लवकरात लवकर जाहीर करू. तुमच्या पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद’, असे ‘मामी’ मुंबई चित्रपट महोत्सवाचे संचालक शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

संताप का?

प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर एक पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे. ‘भारताची आर्थिक व मनोरंजन राजधानी म्हणून नेहमीच झगमगाटात राहणारी ‘मुंबई’ स्वतःचा प्रतिष्ठेचा महोत्सव सुरू ठेऊ शकत नाही, हा अत्यंत ‘क्रूर विरोधाभास’ आहे. चित्रपटसृष्टीच्या स्वयंघोषित संरक्षकांनी झगमगते व्यासपीठ आणि सुरक्षित पर्यायांच्या दिशेने धाव घेतली, परिणामी महोत्सवाकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर हा महोत्सव काही हौशी व उत्साही लोकांच्या हाती आल्यानंतर त्यांची निष्ठा आणि समर्पित भावनेमुळे सुरू राहिला. मात्र आता या मंडळींनी टिकवलेल्या महोत्सवाचीही ज्योत विझली आहे. कोणतीही संतापाची लाट उसळलेली नाही, कोणताही अधिकृत समारंभ नाही, फक्त शांततापूर्ण वातावरणात हा महोत्सव हळूहळू बंद होत आहे. हा महोत्सव एक सांस्कृतिक आधारस्तंभ असायला हवा होता, परंतु आता या महोत्सवाचे स्वरुपच संकुचित झाले आहे. प्रगतीच्या मुखवट्यामागे लपलेली उदासीनता बाहेर आली आहे’, असे मत हंसल मेहता यांनी व्यक्त केले आहे.

‘मामी’ मुंबई चित्रपट महोत्सवाची सुरुवात १९९७ साली करण्यात आली. मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेसतर्फे आयोजित होणारा हा महोत्सव एक प्रतिष्ठित व प्रसिद्ध चित्रपट महोत्सव मानला जातो, या महोत्सवाला दरवर्षी हजारो लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार, विद्यार्थी व चित्रपटप्रेमी भेट देत असतात. मात्र यंदा २०२५ साली हा महोत्सव होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर मनोरंजनसृष्टीत नाराजी पसरली असून या निर्णयाविरोधात विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.