मुंबई : विविध मंदिर प्रशासनात विचारांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकांना साहाय्य करण्यासाठी, तसेच एकजुटीसाठी १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान तिरुपती येथे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात जगभरातील ५८ देशांमधील सुमारे १५८१ हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन संस्था एकत्र येणार आहेत.
या संमेलनात मंदिरात येणाऱ्या निधीचे आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबतही चर्चा केली जाणार आहे. तसेच, गर्दी नियंत्रण, शाश्वतता आणि सुरक्षा शिष्टाचार, एआय, डिजिटल आणि फिनटेक तंत्रज्ञानाद्वारे मंदिर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्याबाबतच्या विषयांवर विशेष भर दिला जाईल. लंगर आणि अन्न वितरण प्रणाली, कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर, शाश्वत ऊर्जा पद्धती आणि कायदेशीर अनुपालन यांसारख्या विषयांवर मुखत्वे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. अधिक कार्यक्षम आणि सामाजिक कार्यात मोलाचा वाटा देणारी मंदिरे तयार करण्याच्या उद्देशाने चर्चांमध्ये नागरिकांना वैद्यकीय मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य आदींवर चर्चा, मार्गदर्शन केले जाणार आहे. विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी संमेलनात भाषणे, पॅनेल चर्चा, कार्यशाळा आणि मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत. दरम्यान, ‘द जर्नी ऑफ वासवी टेम्पल्स अँड बटू केव्हज’ यासह अन्य विषयांवर केस स्टडीज सादर करण्यात येणार आहेत. तसेच, स्मार्ट टेम्पल्स मिशन आणि स्मार्ट टेम्पल्स मिशन पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे. यात १२ वेगवेगळ्या श्रेणींमधील जगभरातील सर्वोत्तम मंदिरांचा सन्मान केला जाईल.
मंदिरांचा महाकुंभ (आयटीसीएक्स) ही भारतीय परंपरेच्या मंदिरांबद्दल माहितीचे दस्तऐवजीकरण आणि डिजिटलायझेशन करण्यासाठी एक अग्रगण्य व्यासपीठ आहे. हे मंदिर संमेलन टेम्पल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे मुख्य प्रतोद प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत आहे. या मंदिर संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आंध्र प्रदेशचे मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश, इस्कॉनचे भारतातील संवाद विभागाचे संचालक युधिष्ठिर गोविंद दास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
© The Indian Express (P) Ltd