मुंबई : बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हा नारा जवळपास सहा दशकांहून अधिक काळ दिला जात आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील मराठी जनांचा संघर्ष गेली अनेक वर्षे सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि भाषिक तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील दीर्घकालीन आणि गुंतागुंतीच्या बेळगाव सीमा वादावर प्रकाश टाकणारा ‘फॉलोअर’ हा मराठी चित्रपट येत्या २१ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सीमा भागांतील तीन मित्रांची रंजक गोष्ट या चित्रपटातून पाहता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फॉलोअर’ चित्रपटाची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स व कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांनी केली आहे. आजवर विविध चित्रपट महोत्सव आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टर हे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. लक्षणीय मराठी भाषिक लोकसंख्या असलेले बेळगाव शहर हे महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील वादाचा मुद्दा राहिले आहे. त्यावरून गेली अनेक वर्षे सामाजिक उलथापालथ होत आहे, राजकीय मुद्दे गाजत आहेत. तेथील राजकीय आणि सामाजिक गतिशीलतेचा वेध घेणारी तीन मित्रांची एक रंजक कथा ‘फॉलोअर’ चित्रपटात मांडण्यात आली असून ती कथा नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी २१ मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘फॉलोअर’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तसेच बेळगाव, बंगळूरू येथे एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मराठी, कन्नड आणि हिंदी भाषेचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र, हर्षद नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते असून राघवन भारद्वाज, चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांचे असून मुख्य भूमिका सुद्धा त्यांनीच साकारली आहे. तसेच रघु बसरीमारद, डोना मुन्शी आदी कलाकार झळकत आहेत. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रण, मौलिक शर्मा संकलक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सम्यक सिंग यांनी गीतलेखन व गायनाची धुरा सांभाळली आहे. तसेच त्यांनी अभिज्ञान अरोरा यांच्यासह सर्व गीते संगीतबद्ध केली आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie follower to be released on 21st march based on belgaon border dispute mumbai print news css