मुंबई : मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा व लोकभाषा आहे. मराठी भाषेचे स्वतंत्र व्याकरण, लिपी व विपुल साहित्यसंपदाही आहे. प्राचीन शिलालेखावरही मराठी भाषेचा उल्लेख आढळतो. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी असलेल्या सर्व निकषांना मराठी भाषा पात्र ठरत आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.
आघाडीत श्रेयवाद -भांडारी
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेत असून त्यांच्याबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नाहीत. त्यामुळे या दोन पक्षांचा मराठीला अभिजात दर्जा मिळण्यास विरोध आहे की केंदाकडून तो लवकरच मिळण्याची अपेक्षा असल्याने आघाडीत श्रेयावरून चढाओढ आहे, असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी केला.