राज्य कृतिदलाचा निर्णय; सर्व बालकांचे २६ जानेवारीपर्यंत लसीकरण करण्याचा निर्धार

मुंबई : राज्य कृतिदलाने गोवरला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यामध्ये दोन टप्प्यांत लसीकरण करण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील एकही लशीची मात्रा न घेतलेल्या बालकांच्या लसीकरणावर भर देताना हे अभियान दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. 

१५ ते ३० डिसेंबपर्यंत बालकांना पहिली मात्रा तर १५ ते २६ जानेवारीपर्यंत बालकांना लशीची दुसरी मात्रा देण्यात येणार असल्याची माहिती राज्य कृतिदलाचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली. राज्यातील सर्व बालकांचे २६ जानेवारीपर्यंत लसीकरण करण्याचा निर्धार राज्य कृतिदलाने केला आहे. त्यानुसार कृतिदलाने आराखडा तयार केला आहे. कृतिदलाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गोवर-रुबेलासाठी विशेष लसीकरण अभियान राबवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दृक्-श्राव्य माध्यमातून मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि आरोग्य खात्यातील सर्व राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना आरोग्यमंत्री यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि संचालक हेही उपस्थित होते. राज्यात राबविण्यात येणाऱ्या गोवर – रुबेला विशेष लसीकरण अभियानांतर्गत राज्यात गोवरचा उद्रेक झालेल्या भागांतील सर्व बालकांची मोजणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही मोजणी करताना जिल्हा, तालुका, पालिका, नगरपालिका याचबरोबरच विभागनिहाय, वॉर्डनिहाय व बूथनिहाय करण्यात येणार आहे. यातून जिल्हे आणि महापालिका यांनी स्थानिक पातळीवर या विशेष अभियानासाठी लाभार्थी यादी तयार करणे, त्यानुसार अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन करणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे, या अभियानाची प्रभावी प्रसिद्धी करणे आदी पूर्वतयारी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

विशेष अभियानात गोवर-रुबेलाची एकही लशीची मात्रा न घेतलेल्या ९ महिने ते ५ वर्षे या वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व बालकांचे लसीकरण होईल या अनुषंगाने त्यांची नोंदणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्यातील अडीच लाख बालकांचे लसीकरण झाले आहे. मोजणी झालेल्या बालकांना १५ ते ३० डिसेंबपर्यंत लशीची पहिली मात्रा देण्यात येणार आहे. त्यानंतर चार आठवडय़ांनंतर बालकांना लशीची दुसरी मात्रा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे १५ ते २५ जानेवारीपर्यंत लशीची दुसरी मात्रा देण्यात येऊन २६ जानेवारीपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कृतिदलाचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके यांनी केली.

लशीचा पुरेसा साठा उपलब्ध 

राज्यातील गोवरच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व बालकांचे लसीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या मात्रा सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे लसीकरणामध्ये कोणतीही अडचण येणार नसून, सर्वाचे लसीकरण करण्याकडे आमचा कल असल्याचेही डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले. सध्या राज्यामध्ये १३ लाख ५३ हजार ८२० लशींचा साठा उपलब्ध आहे. यामध्ये जिल्हास्तरावर ११ लाख ५५ हजार ५७०, विभागीय स्तरावर १ लाख १९ हजार २५० आणि राज्य स्तरावर ७९ हजार इतका लससाठा आहे.

१२३७

गोवर प्रभावित भागात एकूण कार्यरत सर्वेक्षण पथके

३६,३९९

‘जीवनसत्त्व अ’ची मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या

१४,८३,५२८ 

आतापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेली घरे

१५,४९० 

गोवर-रुबेला पहिली लस मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या

९,२७७

गोवर-रुबेला दुसरी लस मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या

विशेष मोहिमेंतर्गत १५ हजार बालकांचे लसीकरण

मुंबई : केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार १ डिसेंबरपासून मुंबई महापालिकेकडून विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सहा दिवसांमध्ये १५ हजार १० बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ९ महिने ते पाच वर्षे वयोगटातील १४ हजार २८५ बालकांचा, तर ६ ते ९ महिने वयोगटातील ७२५ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

विशेष लसीकरणासाठी मुंबई महापालिकेकडून गोवरचा उद्रेक असलेल्या १६ भागांमध्ये ५२ आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच मंगळवारी मुंबईमध्ये गोवरचे आठ रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या ४२० झाली आहे, तर ७१ संशयित रुग्ण सापडल्याने संशयित रुग्णांची संख्या ४ हजार ६५८ झाली आहे. मंगळवारी २८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. गोवरचा उद्रेक झालेल्या भागामध्ये मुंबई महापालिकेकडून विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार गोवरचा उद्रेक असलेल्या भागातील ९ महिने ते पाच वर्षे वयोगटातील निश्चित केलेल्या १ लाख ९१ हजार ६७ बालकांपैकी आतापर्यंत १४ हजार २८५ बालकांना गोवर रुबेला लशीची विशेष मात्रा देण्यात आली आहे. ९ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी मुंबईच्या १६ प्रभागांमध्ये ५२ आरोग्य केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ९ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवरच्या रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा १५ आरोग्य केंद्रांवर ६ ते ९ महिने वयोगटातील ३ हजार ७५२ बालकांपैकी ७२५ बालकांना गोवर रुबेला लशीची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये गोवरचे आठ रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या ४२० झाली आहे. तर ७१ संशयित रुग्ण सापडल्याने संशयित रुग्णांची संख्या ४ हजार ६५८ झाली आहे. मंगळवारी २८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ४० नवे रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. मुलाचा मृत्यू ब्रॉन्को न्यूमोनियामुळे : गोवंडी येथील आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू गोवरने न झाल्याचे सोमवारी महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. मृत्यू विश्लेषण समितीने दिलेल्या अहवालानुसार या मुलाचा मृत्यू ब्रॉन्को न्यूमोनियामुळे झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

करोनाप्रमाणे गोवर रुग्णांच्या चाचण्यांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा

मुंबई : गोवर रुग्णांच्या घशातील स्रावाच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी सध्या राज्यात कोणतीही प्रयोगशाळा उपलब्ध नाही. त्यामुळे गोवरला प्रतिबंध करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी राज्यात स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभी करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. गोवरला प्रतिबंध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य कृती दलाने १० कलमी कृती योजना जाहीर केली. त्यानुसार राज्यात गोवर तपासणीसाठी प्रयोगशाळांचे जाळे अधिक विस्तृत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

संशोधनावर भर

गोवरचा प्रादुर्भाव हा यापुढेही राहणार आहे ही बाब लक्षात घेऊन गोवरसंदर्भात संशोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी संशोधन संस्था, राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही) आणि केंद्र सरकारच्या संस्था यांच्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नमुन्यांची चाचणी, तांत्रिक प्रक्रिया यासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रयोगशाळांमधून संशोधनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली.