मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून फक्त ३ किमी अंतरावरील उलवे परिसरात मांस विक्री करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी विमानविषयक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तसेच यामुळे परिसरात कावळे, घारी यासारखे पक्षी आकर्षित होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्याही विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करू नये असा नियम आहे. असे असतानाही नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीपासून ३ किमी अंतरावरील उलवे परिसरातील सेक्टर १९ येथे प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री केली जात आहे. यामुळे नागरी विमान वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या बी. एन. कुमार यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. तसेच एअरड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समितीच्या (एईएमसी) नियमावलीत विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करू नये या नियमाचा समावेश आहे, असे कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, मांस विक्री केल्यामुळे या परिसरात कावळे, घार यांच्यासह सर्व प्रकारचे पक्षी आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधीबरोबरच इतर पक्ष्यांना यांचा अधिक धोका होऊ शकतो. यामुळे स्वच्छतेचे सर्व नियमही धाब्यावर बसवले जात आहेत. उरण तालुक्यातील चिरनेर येथे जानेवारी महिन्यात कुक्कुटपालकाच्या कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या. यामुळे तालुक्यातील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी पक्षी मारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

याचबरोबर चिरनेर येथील कुक्कुटपालकांना बाधित क्षेत्रातील मृत आजारी निरोगी दिसणारे पाळीव पक्षी त्याचप्रमाणे गिनी टर्की बदकाचे मांस, विष्ठा, अंडी महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन व्यवसायातील पक्षी, अंडी, पशुखाद्य अशा प्रकारच्या साहित्याच्या वाहतुकीस ९ फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली होती. याचबरोबर दहा किमी परिसर बर्ड फ्लू सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या परिसरात योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे , असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. तसेच स्वच्छता आणि इतर सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meat sale within navi mumbai airport limits mumbai print news zws